धडपडणारा श्याम 23
''मला प्रथम इथली भाकरी मुळीच सोसेना. आमांशही झाला. परंतु मी कुणाजवळ बोललो नाही,'' मी म्हटले.
''पण औषधें?'' गोविंदाने विचारले.
''खिशात शेपा ठेवल्या होत्या, त्या येता जाता खात होतो. त्यामुळे रोग हटला. आता प्रकृती बरी आहे,'' मी म्हटले.
''तुला औषधंही माहीत आहेत,'' गोविंदा हसत म्हणाला.
''आईने हा उपाय मुद्दाम सांगितला होता,'' मी म्हटले.
''आई किती दूरवरचे पाहाते. तिला सारी काळजी,'' गोविंदा म्हणाला.
दुपारी मी गोविंदाकडेच बसलो होतो. गोविंदाचे हस्ताक्षर फारच सुंदर होते. मोत्यांसारखे दिसे.''किती रे गोड तुझे अक्षर. पाहात राहावंसे वाटतं,'' मी त्याची वही हातात घेऊन म्हटले.
''गोंदूबांचे ड्रॉईंगसुध्दा चांगलं आहे,'' बंडू म्हणाला.
''परंतु गणिताची मला विशेष गोडी आहे,'' गोविंदा म्हणाला.
''म्हणजे तू माझ्या जातीचा नाहीस एकूण? मला जे जे मित्र भेटतात ते कलावान नि गणिती. मला कलेचा गंध नाही नि गणित समजत नाही,'' मी म्हटले.
''तुझ्याजवळ दुसरी काही कला असेल. त्या दिवशी आपण फिरायला गेलो होतो, तेव्हा तू सारखा आकाशातील रंगांकडे बघत होतास. मला वाटलं श्याम कवी असावा,'' गोविंदा म्हणाला
''होय. मी कवी आहे. मी घरुन आलो. त्या वेळच्या प्रसंगावर एक कविता केली आहे,'' मी म्हटले.
'' मग म्हण..म्हण .. आम्हांलाही ऐकू दे ना,'' गोविंदा म्हणाला
मी कविता म्हणू लागलो. दिंडी वृत्त होते.
दूर शिकण्याते श्याम निघे जाया
रडे माता तिज आवरे न माया ।
पुशी लोचन ती धरुनी मनी धीर
धैर्य लोपे येऊन पुन्हा नीर ॥ १॥
प्रकृतीला तू जपत सदा जाई
असे सांगे स्फुंदून मला आई।
आठ दिवसांनी पत्र लिही बाळ
असे करणारा प्रभुवर सांभाळ ॥ २॥
चुलीमधली आणून लावि तीट
वदे सत्याने वाग सदा नीट ।
श्याम अश्रूंनी भिजवि मातृपाय
दृश्य कविला ते वर्णवेल काय? ॥ ३॥