धडपडणारा श्याम 35
''तुकाराम, हा श्याम हो. कोकणातला आहे. विद्येसाठी इथे आलाय. हाताने स्वयंपाक करतो,'' ती म्हणाली.
''कितवीत आहात?'' त्याने विचारले.
''सहावीत,'' मी उत्तर दिले.
''श्याम, आज काय स्वयंपाक करणार?''म्हातारीने विचारले.
''अद्याप ठरवलं नाही,'' मी म्हटले.
''पीठ आहे का?'' तिने फेरतपासणी चालवली.
''नाही,'' मी म्हटले.
''मग?'' ती म्हणाली.
''बघू,'' मी बोललो
''तुकाराम, तू ह्या श्यामला देत जा ना रे रोज दोन-चार भाक-यांच पीठ. तुझ्याकडे तर गाडयावारी दळायला येत. पोतीच्या पोती येतात,'' आजीबाई सांगत होती.
'सहज देत जाईन. श्यामराव, एखदं फडकं देऊन ठेवा. त्यात बांधून ठेवीत जाईन,'' तुकाराम म्हणाला.
''आजी, असं चांगलं नाही, लोकांचं का घ्यावं?'' मी म्हटले.
''श्यामराव, फार का घ्यायचंय? आजूबाजूला किती तरी पीठ उडतं, ते गोळा केलं, तरी दहाजणांचे पोट भरेल. व्यापारी तर पोतीच्या पोती दळून नेतात. चार मुठींनी काय होणार?'' तुकाराम म्हणाला.
इतक्यात सखाराम हाक मारीत आला.
''श्याम ते इंग्रजी जरा वाचू ये. येतोस का?'' तो म्हणाला.
''येतो,'' मी म्हटले
मी तुकारामला 'जातो' म्हणून सांगून, सखारामच्या खोलीत वाचायला गेलो. आम्ही इंग्रजी वाचले, भाषांतरही केले. सायन्सचा एक प्रयोग मी सखारामपासून समजावून घेतला. सखारामची शास्त्रीय दृष्टी होती. त्याला सायन्स भराभर समजे. दहा वाजायला आहे होते मी माझ्या खोलीत परत आलो. दु्रुपदीची आई कामाला गेली होती. म्हातारा-म्हातारीही बाहेर गेली होती. कदाचित तुकारामाबरोबर गेली असतील. माझ्या खिशात सात-आइ आणेच शिल्लक होते. मी बाजारात गेलो. गवार स्वस्त होती. मी दिडकीची गवार घेतली. कितीतरी आली. मी घरी आलो. भराभर गवा-या निवडल्या. चूल पेटवून त्या फोडणीस टाकल्या.
मी वाचीत बसलो. पुण्याहून येताना मामाकडचे न्यायमूर्ती रानडयांचे 'राइझ ऑफ द मराठा पॉवर' (मराठयांच्या सत्तेचा उदय) हे इंग्रजी पुस्तक मी आणले होते. ते मी वाचीत होतो. मला ते पुस्तक फार आवडे. किती सुंदर इंग्रजी भाषा ते लिहीत!
गवारीची भाजी शिजून तयार झाली, तशी मी उतरली. मी गवारीची भाजी खाऊ लागलो. एकीकडे वाचीत होतो. एकीकडे खात होतो. लहानपणापासून मला भाजी पुष्कळ लागते. माझ्या वडिलांनाही भाजी फार हवी असे. ते म्हणत, ''भात थोडा असला तरी चालेल. परंतु भाजी भरपुर हवी,'' पुष्कळ भाजीपाला खाल्ल्यामुळेच वडिलांच्या त्या किरकोळ शरीरात पुष्कळ उत्साह असे. बाराबारा कोस ते सहज चालून जात. विशेषत: पालेभाज्यांत उत्साहप्रद सत्व बरेच असते. चपळाई त्याच्यामुळे मिळते, असे म्हणतात.