धडपडणारा श्याम 39
''श्याम, एखादवेळेस रोटी नसली, तर मागत जा. तू कधी कधी जेवतच नाहीस, असं एकनाथ सांगत होता,'' मुजावर म्हणाला.
''ज्या दिवशी जरुन वाटेल, त्या दिवशी अवश्य मानेन,'' मी म्हटले.
''संकोच नको करु. आपण एका वर्गातली मुलं,'' तो म्हणाला.
''नि सारी देवाची लेकरं,'' मी म्हटले.
''श्याम, तुझ्याजवळ खूप बोलावंस वाटतं. पण तुझ्याजवळ आलं, म्हणजे काय बोलावं तेच समजत नाही, बरं, मी जातो,'' असे म्हणून मुजावर निघून गेला.
मुजावर ठेंगणा होता. वाटोळा होता. तो खूप अभ्यासू होता. सारे ठरलेल्या वेळी, ठरलेले त्याचे काम. वर्गात कधी फार बोलायचा नाही. अभ्यास बरा, की आपण बरे. मुजावरबद्दल मला आदर वाटे एकनाथप्रमाणेच तो पाठीवर सोडलेला रुमाल बांधी. एकनाथचा रुमाल हळदी रंगाचा होता, मुजावरचा स्वच्छ पांढरा असे, एवढाच फरक.
अशा रीतीने दिवस चालले होते. पीठ संपले, म्हणजे मी तुकारामकडे जात असे. गिरणीत पोतीच्या पोती पडलेली असत. तुकाराम माझी पोटळी बांधून देई. तेथून पीठ आणण्याची मला सवयच जडली. प्रथम पाप वाटले, नंतर संकोच वाटला, शेवटी सवय झाली. हळूहळू आपण विष पचवीत असतो. तुकारामजवळून पीठ घेण्याची माझी जणू वतनदारीच मी स्थापन केली. मला त्याबद्दल काही वाटतनासे झाले.
शेवटी आजी-आजोबा, जायचा दिवस उजाडला. ती दोघे पायीच मुक्काम करीत करीत जाणार होती, जेवून-खाऊन निघणार होती.
''श्याम, आज आमच्याबरोबर ये भाकरी खायला,'' म्हातारी म्हणाली.
आजी-आजोबा, द्रुपदीची ची आई, द्रुपदीची ची भावंडे, मी, सारी भाकरी खात होतो.
''श्यामला भाकरी भाजून देत जा. कधी कधी कालवणही देत जा, बरं का दु्रपदीच्या आई'' म्हातारी म्हणाली.
''मी मागेच त्याला तसं सांगिलं आहे,'' ती म्हणाली.
''तुकाराम तुला भेटत जाईल,'' म्हातारी म्हणाली.
''मीही त्यांना भेटत जाईन,'' मी म्हटले.
जेवणे झाली त्यांनी आपली गाठोडी बांधली, दोन गाठोडी होती. मी कोट घातला. एक गाठोडे मी उचलले.
''तू कुठे येतोस?'' म्हातारीने विचारले.
''मी तुम्हांला शिवेपर्यत पोचवतो,'' मी म्हटले
''शाळेला उशीर होईल,'' म्हातारदादा म्हणाले.
''होऊ दे. शाळा रोजचीच आहे. तुम्ही आता पुन्हा केव्हा भेटाल?'' मी सद्गदित होऊन म्हटले.
''आमच्याबरोबर आपला तू नुसता ये गाठोडं घेऊ नकोस,'' म्हातारी म्हणाली.
''का बरें? मी का परका आहे? तुकाराम येता, तर त्याने नसतं का घेतलं? मी माझ्या आईचं नसतं का घेतलं? तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंत, मी का गाठोडंसुध्दा नको घेऊ,'' मी केविलवाणे विचारले.
मी गाठोडे घेऊन निघालो. द्रुपदीच्या आईला विचारुन, ती दोन पिकली पाने निघाली. मी बाहेर रस्त्यावर थांबलो होतो, आम्ही तिघे चालू लागलो. शाळा भरु लागली होती. मुले शाळेत येत होती. खांद्यावर गाठोडे घेऊन मी जात होतो. मुले माझ्याकडे बघत होती. काही माझा अवतार पाहून हसत होती. मला बिलकुल लाज वाटत नव्हती. त्या वेळेस मला माझा अभिमान वाटत होता. माझ्यात माणुसकी आहे. असे मनात येऊन, मला कृतार्थता वाटत होती. ते खांद्यावर गाठोडे नव्हते. ती प्रेमाची शिदोरी होती. प्रेमाला खांद्यावर घेऊन मी जात होतो. लोकांना ते गोधड्यांचे, लुगड्यांचे गाठोडे दिसत होते. परंतु त्या गोधडयात, त्या चिंध्यात, त्या वस्त्रांत अहेतुक अपार प्रेमाचे भरजरी पीतांबर होते. त्यांना ते कसे दिसणार? ज्याचे त्याला ठावे.