धडपडणारा श्याम 68
मी अगदी दमून गेलो. पावसाच्या माराने थकून गेलो. पाय जोराने चालत ना. हळूहळू मी जात होतो. औंधचे दिवे केव्हा एकदा दिसू लागतात, असे वाटत होते. शेवटी एकदाचे दिवे दिसू लागले. मला आनंद झाला. निधान मिळाले असे वाटले. रस्त्यात पाणीच पाणी झाले होते. गटारे भरून वाहात होती. मी गावात शिरलो. चिटपाखरूही कोणी भेटले नाही. पावसात रस्त्याचे कंदील मात्र संतांप्रमाणे शांतपणे प्रकाश देत होते. मी माझ्या खोलीत आलो.
''श्याम, आत्ता आलास?'' द्रुपदीच्या आईने विचारले.
''हो,'' मी म्हटले.
''पावसातून आलास, रात्र तरी किती झाली? '' ती म्हणालो.
''काढ ते कपडे, कढत पाणी देत्ये आंग धू,'' पायांवरून कढत पाणी घेताना किती बरे वाटत होते! दापोलीला शिकत असताना मी घरी चालत जात असे. त्या वेळेस आई असेच कढत पाणी पायांवर घेण्यासाठी देत असे. आईच्या प्रेमाची आठवण द्रुपदीच्या आईने दिली. मी खोली झाडली. कपडे वाळत घातले. इतक्यात दाजीबांची बहीण मला जेवायला बोलवायला आली.
'' चल रे श्याम, भाकरी आहे, दूध आहे खा. अरे केस पूस तरी जरा नीट. आजारी पडशील हो अशाने,'' ती मायाळूपणाने म्हणाली.
मी दाजीबांकडे जेवायला गेलो. पोटभर भाकरी खाल्ली. एका तव्यावर निखार घालून दाजीबांच्या बहिणीने शेकायला दिले होते. दाजीबांचा प्रेमळ भाचा कोठे दिसेना. मी म्हटले,
'' दाजीबा, बापू कुठे गेलाय?''
'' कुणाकडे गाणं आहे, तिथे गेलाय,'' त्याची आई म्हणाली.
'' बापू मला फार आवडतो. नेहमी हसतमुख असतो,'' मी म्हटले.
'' परंतु तो दाजीबांना चिडवतो. मग दाजीबा रागवून म्हणतात,'' काही शिकणार नाही वाजवायला. हो चालता,'श्याम तू तरी बापूला चार शब्द सांग,'' ती म्हणाली.
'' मी आज एका फरशीवरून वाहून जाणार होतो,'' मी म्हटले.
''श्याम, फरशी धोक्याची असते बरं का,'' ती म्हणाली.
'' माझी इच्छा असली, तरी मी वाहून जाणार नाही. मी देवाला आवडत नाही,''
मी म्हटले.
''परंतु आम्हांला आवडतोस. तू दोन-चार दिवस इथे नव्हतास तर घडीघडी तुझी याद यायची इथे आजूबाजूला दुयरे विघार्थी नसतात का?पण तू जसा येतोस, बसतोस, खातोस-पितोस, तसं कोण येतं-जातं? तू इथल्या आमच्या सर्वाच्या घरचा झाला आहेस,'' बापूची आई म्हणाली.
माझे जेवण झाले. मी खोलीत आलो. अंथरूण घालून झोपलो.
इतक्यात बापूची आई येऊन म्हणाली, ''श्याम तुझी घोंगडी तर भिजलेली दिसत्येय. पांघरायला रे काय घेणार? ही वाकळ घे. ऊठ.''
मी वाकळ घेतली. आईच्या चौघडीत जसा मी भक्तिभावानेद गुरंगुटी करून निजत असे, तितक्याच भक्तिप्रेमाने ती वाकळ अंगावर घेऊन मी झोपी गेले!