धडपडणारा श्याम 29
असे अनेक माणुसकीला लाजवणारे प्रसंग मला आठवतात. माझी मान त्यामुळे खाली होते; परंतु माझा क्रोध मी किती कमी केला आहे, हे पाहून थोडे बरे वाटते.
'विवेकें क्रिया आपुली पालटावी! विवेक हा मानवाचा विशेष आहे. आपण काय स्वीकारतो व कशाचा त्याग करतो, ह्याच्यावर आपली खरी किंमत आहे. आपण वासनांचे गुलाम झालो, तर पशू ठरु; वासनांचे स्वामी झालो, तर मनुष्य ठरु. टेनिसन कवीने एके ठिकाणी म्हटले आहे, 'आपणात माकडाचे व वाघाचे पुष्कळसे गुण आहेत, ते प्रयत्नाने दूर करणे, हे आपले कर्तव्य आहे.' किती यथार्थ आहे. आपण माकडांपासून जन्मलो, असे शास्त्रज्ञ डार्विन सांगतो. आपण आपल्या माकडचेष्टांनी डार्विनचे म्हणणे आपल्या कृतीने रोज सिध्द करीत आहोत. जगाला बोचकारायला आपली सर्दव तयारी असते. जगाला फाडून खयला आपण मागेपुढे पाहात नाही. खरे म्हटले, तर जग अद्याप माणसाळलेलेच नाही. ऍमिल ह्या थोर पाश्चात्य ग्रंथकाराने म्हटले आहे. 'आपण मानवजातीची परीक्षा द्यायला आलेले सारे उमेदवार आहोत,' ह्या परीक्षेत शेकडा किती निकाल लागेल देव जाणे. मॅट्रिकच्या परीक्षेत कत्तल होते, म्हणून आम्ही सारे ओरडतो; परंतु मानवाच्या परीक्षेत बहुतेक शेकडा शून्य निकाल लागत आहे, ह्याची ओरड कोणी करायची? जे खरे मानव असतील तेच करतील. मानव व्हायची ज्यांना तळमळ असेल, तेच त्यासाठी धडपडतील.
जगातील राष्ट्रे एकमेकांस जोपर्यत गुलाम करीत आहेत, तोपर्यत माणसांची राष्ट्रे जगात आहेत. असे म्हणता येणार नाही. गुलाम करणारे व गुलाम होणारे दोघे पशूच. जर्मनी, जपान, इटली, इंग्लंड ही माणसाची राष्ट्रे आहेत, असे कोण म्हणेल? अमेरिकेतला मागचा एक प्रेसिडेंट थ्रिऑडर रुझवेल्ट एकदा म्हणाला होता, 'हिंदुस्थानातील लोक उंदाराप्रमाणे पळतात व मरतात' आम्ही उंदीर आहोत. नीगोंना जाळणारी अमेरिका लांडग्यांची आहे. कोठे मानवी आकाराचे उंदीर तर कोठे मानवी आकाराची मांजरे. हेच जगाचे स्वरुप आहे. ह्या कोटयावधी मानवी पशूंत एखादा खरा नर दिसतो, एखादा खरा मानव दिसतो आणि नराचा नारायण होणारा तर हजारो वर्षात एखादा दिसतो!
इंग्रजी लेखक स्विफ्ट म्हणत असे, 'मनुष्य नावाचा जो पशू आहे, त्याची मला चीड यते,' माझे इतर भाऊ पशू आहेत असे म्हणण्याचे धाडस स्विफ्टने केले, तरी मी करता कामा नये. मी पशू आहे. हे पदोपदी माझ्या अनुभवास आले आहे. कधी मी बेडूक धरणारा साप होतो, कधी मी दुबळा बेडुक होतो. कधी मी गोगलगाय बनतो, तर कधी वृक-व्याघ्र बनतो, काय हे जीवन! परंतु अशा ह्या जीवनातूनच भले निर्माण करायचे आहे. ह्या मातीचीच कस्तुरी करायची आहे. आपल्याला जे पाहिजे असेल, ते ह्या जीवनातून मिळेल.
मला शाळेत जायचे होते. भाकरी केव्हा होणार! चुलीत लाकडे धडधड पेटत होती. माझ्या डोळयातून क्रोधाचे, अगतिकत्वाचे अश्रू घळघळ वाहात होते. मी शेवटी उठलो. तो फेकलेला तवा परत आणला.
''श्याम, काय आहे आदळ-आपट? चूल पाहा पेटून चालली,'' म्हातारी आजी प्रेमाने बोलली.
मी रडत होतो, मी काही बोललो नाही. म्हातारी आजी खोलीत आली. तिने सारा प्रकार पाहिला. चटकन तिच्या सारे ध्यानात आले.
''भाकरी जमत नाही वाटतं!'' तिने पुन्हा विचारले.
''हो, एक तास झाला'' परंतु भाकरी काही होत नाही,'' मी म्हटले.
''मी देऊ का भाजून?'' तिने सहज प्रेमाने व दयेने विचारले.
''चालेल द्या,'' मी म्हटले.
प्रेमळ म्हातारी चुलीजवळ बसली. तिने तवा नीट खरडून काढला. तवा चुलीवर चढला. म्हातारीने भाकरी थापली. भाकरी तव्यावर गेली. मी पाहात होतो. पाच-दहा मिनिटांत दोन भाक-या झाल्या.
''पुरेत दोन,'' मी म्हटले.