धडपडणारा श्याम 46
मी संस्कृत श्लोक रचले, ते निर्दोष आहेत, असे मला वाटले, पण त्यात एक-दोन चुका होत्या, त्या त्या वेळेस माझ्या लक्षात आल्या नाहीत. ते श्लोक मी पुन्हा पुन्हा वाचले. एक पत्रही लिहिले. त्यात ते श्लोक घातले. पत्र पाकिटात घालून ठेवले. वेळ किती झाला ते कळलेच नाही. दोन वाजून गेले होते. मी बाहेर आलो. वारा नव्हता, तरी गारवा होता. जवळ तुरुंगात आलबेल झाली. मी पुन्हा खोलीत गेलो व दिवा मालवून अंथरुणावर पडलो. मी जणू स्वप्नसृष्टीत होतो. पुण्याच्या पुण्यमय व प्रेममय वातावरणात होतो.
शेवटी एकदाचे उजाडले. सखारामकडे जाऊन ते पत्र दाखवले. पत्र व श्लोक वाचून त्यांला आनंद झाला. ''तुझं काम नक्की होणार,'' असे तो म्हणाला. त्याने पत्ता लिहिला. मी काप-या हाताने ' ते ' पत्र पेटीत टाकून आलो.
त्या पत्राच्या उत्तराची मी किती उत्कंठेने वाट पाहत होतो! एकदाचे उत्तर आले. पुण्याचा छाप होता. ते पत्र रामचे नव्हते, मावशीचे नव्हते. निराळे हस्ताक्षर होते. मी ते पत्र फोडले, वाचून मुखावर आनंद झळकला.
'आमच्या मुलांना शिकवा, तुमची काही तरी व्यवस्थाची करु,' असा मजकूर होता. मोघम मजकूर. परंतु मला तो मोघम वाटला नाही. मी ते पत्र सखारामला दाखवले. गोविंदालाही दाखवले. गोविंदा अधिक व्यवहारज्ञ. तो म्हणाला, ''शाळेतून आधी नाव काढू नये. पुण्या जाऊन कसं काय जमतं ते पाहावं. मागून दाखला मागवता येईल. जाण्याची फार वाच्यताही करु नये, निमूटपणे जावं,''
त्याच रात्री जायचे मी ठरवले. एकनाथ, वामन, मुजावर, दाजीबा ह्या सर्वाची मी प्रेमाने भेट घेतली. दु्रपदीच्या आईच्या पाया पडलो.
''श्याम, तुला यश येवो!'' एकनाथ म्हणाला.
''नाही जमलं तर परत ये. आम्ही भाकरी देत जाऊ'' मुजावर म्हणाला.
''श्याम, ताबडतोब पत्र पाठव,'' सखारामने सांगितले.
''वानवडीला पलटणीत जाऊन माझ्या मुलाला भेट हं, श्याम,'' द्रुपदीची आई म्हणाली.
''द्रुपदीच्या आई, सध्या महायुध्द सुरु आहे. भेटू देतील की नाही, सांगता येत नाही.
मी प्रयत्न करीन,'' मी म्हटले.
''श्याम, तू होतास, तर कशी छान पत्रं लिहीत असस, आलेली वाचून दाखवीत असस. आमची आठवण ठेव,'' ती म्हणाली.
द्रुपदीच्या हातात मी एक आणा दिला. तिने तो घट्ट धरुन ठेवला. ट्रंक, वळकटी घेऊन मी व सखाराम निघालो. टपालाच्या गाडीत एक स्वारी सांगून ठेवली होती. गोविंदाही आला. तो काही बोलला नाही. एकमेकांनी हात हातांत घेतले. सखारामला खूप वाईट वाटत होते. त्याच्याच पत्रावरुन मी औंधला आलो होतो. माझ्या बोर्डिंगची व्यवस्था झाली नाही, तो कष्टी असे. पुण्याची ही नवीन आशा त्यानेच आणली होती.
''सखाराम, मी आता जातो. मी तुझ्याजवळ भांडलो, रागावलो, रुसलो. तुझं मन अनेकदा दुखवलं असेल. क्षमा कर. श्याम म्हणजे संयमहीन प्राणी. क्षणात गोड बोलेल, क्षणात हसेल, क्षणात रडेल. मी एकदम संतापतो, चिडतो, खिन्न होतो. सारं विसर. गोड तेवढं आठव,'' मी त्याचा हात हातात घेऊन म्हटले.
''श्याम, तू कसाही असलास. तरी अंतरी चांगलाच आहेस. सर्वाना तू चटका लावतोस, मनं ओढतोस, हृदयं जोडतोस. दु्रपदीची आई तुझ्यासाठी रडली. मी उद्या इथून निघालो, तर माझ्यासाठी कोण रडेल? जा, श्याम. पुन्हा भेटूच,'' तो म्हणाला.
''श्याम, तुझी रोज आठवण येईल!'' गोविंदा म्हणाला.
''तेच माझं जीवनं,'' मी म्हटले.
वेळ झाली. शिट्टी झाली. इतक्यात पाऊस पडू लागला.
''पाऊस म्हणजे शुभ शकुन,'' सखाराम म्हणाला.
''संस्कृतात त्याला दुर्दिन म्हणतात,'' मी म्हटले.
''अरे, आता सारी उलथापालथ व्हायची आहे. जुन्या लोकांना जे बरं वाटतं, ते आपल्याला बुरं वाटेल. त्यांना जे त्याज्य वाटतं, ते आपल्याला ग्राहय वाटेल,'' भविषज्ञ सखाराम म्हणाला.
''श्याम, मनात वेडवाकडं आणू नकोस,'' गोविंदा म्हणाला.
''मी आशेने जातो,'' मी म्हटले.