धडपडणारा श्याम 85
ते पुस्तक चोरताना मी माझी प्रतिज्ञा विसरलो. लहानपणी पुस्तके विकत घेण्यासाठी मी पैसे चोरले होते. त्या वेळेस आई म्हणाली होती, ''श्याम दुस-याच्या वस्तूला लागलेला हा तुझा पहिला व शेवटचा हात होऊ दे'' आईची ती श्रध्दा मी मारली. किती झाले तरी मी दुबळा जीवच होतो. श्याम स्खलनशीलच होता. आईची पुण्याई त्याला तारु पाहात होती.
मुंबईला नवीन विचारांचा आनंद मी लुटीत होतो. परंतु भविष्यकाळ माझ्यासमोर तोंड वासून उभा होता. मी मुंबईहून रामला एक पत्र पाठवले होते. औंधला प्लेग झाल्यामुळे मी पुण्यास न उतरता, परभारा एकदम मुंबईला येऊन, कोकणात गेलो व कोकणातून आता परत आलो वगैरे लिहिले होते. 'माझं हे पत्र म्हणजे संक्रांतीचा तिळगूळ समज' असेही एक वाक्य पत्राच्या शेवटी होते. रामचे उत्तर आले, त्या कार्डावर 'तिळगूळ हलव्याला जसा काटा असतो, तसे बारीक बारीक काटे त्या अक्षरांच्या सर्वागावर काढले होते. ती अक्षरे, म्हणजे पुलकित असे रामचे जणू हृदय होते. ते कार्ड मी हृदयाशी धरले. खरोखरचा तिळगूळ पटकन मटकावला असता; परंतु हा अक्षररुप तिळगूळ अक्षय होतो, टिकण्ाारा होता. तो मी येताजाता खात होतो, मनाने खात होतो व हृष्ट होत होतो.
''श्याम, काय रे आहे त्या कार्डात एवढं?'' शेजारच्या मथुराबाईनी विचारले
''तिळगूळ आहे तिळगूळ तुमच्या हलव्यापेक्षा गोड आहे हि नि सुंदरही आहे,'' मी म्हटले
''कार्डात रे कसा तिळगूळ येईल? हलव्याची पिशवी येते,'' त्या म्हणाल्या.
''परंतु माझ्या मित्राची युक्तीच आहे तशी. तुम्हाला दाखवू?'' मी विचारले.
''बघू दे, '' त्या म्हणाल्या''
मी ती सुंदर काटेरी अक्षरे त्यांना दाखवली.
''इश्श, हा रे कसला तिळगू? नुसती अक्षरं. ती का चाटायची आहेत?'' त्या म्हणाल्या
''चाटून बाटणं म्हणजे काही प्रेम नव्हे,'' मी म्हटले.
''श्याम, तुझ्या सांग ना आणखी काही औंधच्या आठवणी,'' मथुराबाई म्हणाल्या.
''मी नाही सांगत, माझ्या मित्रांना हसता तुम्ही, तुमच्या मित्रांना हसलं तर चालेल का?''
मी विचारले.
''श्याम, पुरुषांना मित्र असतात, स्त्रियांना मित्र नसतात,'' त्या म्हणाल्या.
''मित्र म्हणजे मैत्रिणी हो,'' मी म्हटले.
'अरे, आम्हांला मैत्रिणीही नाहीत, तुम्ही पत्र लिहीता. आम्हांला थोडीच पत्र लिहिता येतील? लहानपणाच्या माझ्या मैत्रिणी आता कुठे असतील, देवाला ठाऊक श्याम , तुमचं आपलं बरं असतं. आमची मैत्रिबित्री सारी मनातल्या मनात. तुला एक -दोन ओव्या म्हणून दाखवू?'' त्यांनी विचारले.
'म्हणा, म्हणा. मला बायकांच्या ओव्या फार आवडतात,'' मी म्हटले. मथुराबाईनी ओव्या म्हटल्या:
आपण मैत्रिणी । पुन्हा भेटू कधी ॥
आठवू मनामधी । ऐकीमेकी ॥
आपण मैत्रिणी । जाऊ ग बारा वाटे ॥
जसे नशिबाचे फाटे । फुटतील ॥
वारियाच्या संगे । आपण पाठवू निरोप॥
पोचतील आपोआप । मैत्रिणींना
''मथुराबाई ओव्या हो कुणाला दाखवताहांत?'' मामीने तिकडून विचारले.
''तुमच्या श्यामला हो,'' त्या म्हणाल्या.
''बायकांच्या ओव्या श्यामला कशाला?'' मामी म्हणाली.
''त्याला आवडतात,'' त्या म्हणाल्या.
''बायकांच्या ओव्या ऐकून आता विद्या करायची आहे वाटतं?'' मामी म्हणाली.
मामी सहज म्हणून बोलली, पण ते सहज बोलणे मला लागले. मी एकदम उठून गेलो.
''श्याम, बस ना रे. ये हलवा देत्ये खरोखरचा,'' मथुराबाई म्हणाल्या.