धडपडणारा श्याम 27
''आंघोळही दोनदा करतोस, संध्याकाळीही जातोस की झ-यावर,'' गोविंदाने विचारले.
''सायंकाळी स्नान केलं, म्हणजे सुंदर झोप येते,'' बंडूने विचारले.
''मग तुम्ही ब्राम्हण कसे नाही, ते तरी सांगा!'' बंडूने विचारले.
''मी वाटेल त्याच्याकडे जेवीन,'' मी म्हटले.
''काय म्हणता? बंडूने आश्चर्याने विचारले,
''खरंच, मी औंधला येताना गाडीवानाजवळची चटणी घेतली. मारवाडयांकडे मी जेवलो आहे. महार, मांग, मुसलमान कोणीही
मला भाकरी देवो. ती मला प्रिय आहे,'' मी म्हटले.
''तुला कुणी शिकवलं हे सारं?'' गोविंदाने विचारले.
''शिकवायला कशाला हवं? आपण सारी माणसं. कुणाचा विटाळ का धरावा? मांस-मच्छर नसलं म्हणजे झालं. एकनाथसुध्दा
जेवले होते की महाराकडे!'' मी म्हटले.
''परंतु ते एकनाथ होते,'' गोविंदा म्हणाला.
''आपणही त्यांच्या मागोमाग जाऊ,'' मी म्हटले.
''बरं आधी जेव,'' गोविंदा म्हणाला.
''खरंच का तुम्हांला भूक आहे?'' बंडूने विचारले.
''हो. तुला संशयात ठेवीत नाही. जेवूनच दाखवतो,'' मी म्हटले मी पुन्हा जेवलो. अशा रीतीने माधुकरीमार्ग आम्ही चोखाळीत होतो; परंतु त्या मार्गाचा मला कंटाळा आला, अगदी वीट आला.
एके दिवशी मी गोविंदाला म्हटले,''गोंविंदा, आपण ही माधुकरी पुरे करु. तुकडे मागूनही पोट नीट भरत नाही.''
''मीही कंटाळलो आहे. आता आम्ही संध्याकाळी हाताने करु म्हणतो,'' गोविंदा म्हणाला.
''मीही असंच काही तरी करीन,'' मी म्हटले.
आमचा निश्चय ठरला. माधुकरी आम्ही बंद केली. मी दुसरा प्रयोग करायचे ठरवले; परंतु हाताने स्वयंपाक करायचा म्हटले, तरी काय नको! महिना तीन-चार रुपये तरी हवेत. ते कोणाकडे मागायचे? मी तर सर्वाना कळवले होते, की माझे येथे नीट चालले आहे. काय रावे, ह्या चिंतेत मी होतो. रुपया-दीड रुपया जवळ होता. सुरुवात करायचे तर मी ठरवले. मग काय व्हायचे ते होवो.