धडपडणारा श्याम 49
''इथे राहायची सोय होणार नाही. तुम्हांला मुलांबरोबर वाचण्याबद्दल, त्यांना काही शिकवण्याबद्दल तीन-चार रुपये देत जाऊ,'' ते म्हणाले.
''पुण्यासारख्या शहरात मी कुठे राहणार, कुठे जेवणार, तीन-चार रुपयांत माझं कसं भागणार?'' मी म्हटले.
''ते तुमचं तुम्ही पाहा,''असे म्हणून ते वर निघून गेले.
इतक्यात घरातून एक पोक्त बाई बाहेर आली.
''जेवला आहेस का रे तू?'' तिने विचारले.
''मी स्टेशनवरुन एकदम इथेच आलो,'' मी म्हटले.
मी रडवेला झालो होतो. त्या गृहस्थांनी मला सर्व खुलासा पत्रात स्पष्ट केला नाही. म्हणून वाईट वाटले. मला त्यांचा राग आला. केवढा होता तो वाडा! दगडी प्रचंड हवेली होती ती ! त्या दगडी हवेलीत राहून त्यांचे मन का दगडाचे झाले होते? तेथे का मला राहायला जागा देत आली नसती? तेथे कुन्नयांना जागा होत्या, परंतु माणसांना नव्हत्या.
मी माझे कपडे काढून तेथे एका खांबाजवळ ठेवले. ती नळावर स्नान केले. धोतर धुऊन तेथे वाळत घातले. मी घरात गेलो. संध्या केली व जेवायला बसलो.
''औंधहून आलेत तुम्ही?'' एका मुलीने विचारले.
''हो, मी म्हटले.
''तिथे कोण होतं तुमचं?'' तिने विचारले.
''कोणी नाही,'' मी म्हटले.
''तुझे आई-बाप नाहीत का?'' त्या पोक्त बाईने विचारले.
''आहेत. ते कोकणात असतात,'' मी म्हटले.
''आणखी हवी का पोळी? पोटभर जेव,'' ती माउली म्हणाली.
माझे जेवण झाले. धोतर वाळले नव्हते. मी तेथे ओसरीवर फे-या घालीत होतो. शेवटी तेथल्या सतरंजीवर जरा पडलो. माझा डोळा लागला; परंतु फार वेळ झोप लागणे शक्य नव्हते. झोपलो असतो तरीही त्यांनी मला नावे ठेवली असती. मी जागा झालो. माझ्या कानांवर घरातील शब्द पडले.
''गरीब दिसतो मुलगा. इथे राहयला म्हणून काय झालं?'' ती माउली म्हणाली.
''दूर असतील तेवढे बरे. माझा अशा मुलांवर विश्वास नसतो. चोरही निघायचे,'' ते गृहस्थ म्हणाले.
''तुम्हाला सारे चोरच दिसतात. तुमचं खातंच चोरांचं. पोलीस खात्यातल्या लोकांना जगात सर्वत्र संशयच दिसायचे,'' ती म्हणाली.
''मला वेळ नाही. त्याला इथे ठेवू नये, असं मला वाटतं. सकाळी तासभर येत जा म्हणावं तीन-चार रुपये देऊ,'' असे म्हणून पुन्हा ते गृहस्थ वर गेले.
सूट, बूट, हॅट वगैरे पोषाख करुन ते खाली आले. मोटारीत बसून गेले. मी तेथेच उभा होतो. ते पुन्हा माझ्याजवळ बोलले नाहीत. त्यांनी आपले आवडते कुत्रे मोटारीत घेतले होते.
माझे धोतर वाळले, मी ते घडी करुन ठेवले.
''माझं सामान इथे असू दे. मी एका मित्राला भेटून येतो,'' मी तेथल्या भय्याला म्हटले.
''अच्छा, जाव,'' तो म्हणाला.
मी रामकडे जायला निघालो. रामला भेटायला मी अधीर झालो होतो. शनवारात राम राहात होता. त्याच्या घरी मी गेलो. सारी भावंडे शाळेत गेली होती. रामची आई फक्त घरी होती.
तिला मी नमस्कार केला.