धडपडणारा श्याम 16
''देव नाही कुठे? ह्या तुमच्या खोलीतही तो आहे. जिथे आपण प्रार्थना करु तिथे देव आहे. जिथे प्रार्थना करु, तिथे मशीदच आहे,'' मुजावर म्हणाला.
''लहानपणी माझा एक मुसलमान मित्र होता. त्याचं नाव अहंमद दहा वर्ष झाली त्या गोष्टीला,'' मी म्हटले.
'' कुठल्या गावी?'' मुजावरने विचारले.
''मुंबईला,'' मी म्हटले.
आम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतो. सखाराम दुस-या दोघांशी बोलत होता.''ह्याचं नाव वामन नि ह्याच एकनाथ,'' सखाराम म्हणाला.
''दोघे भाऊ आहेत,'' मुजावर म्हणाला.
''परंतु एकनाथ लहान आहे,'' सखाराम म्हणाला.
''दिसतो मोठा,'' मी म्हटले.
''हाडापेराने मोठा दिसतो; परंतु तोंडावरुन दिसत नाही,'' मुजावर म्हणाला.
एकनाथ खरोखरच उमदा दिसे. त्याच्या तोंडसवर अद्याप कोवळीक होती. तो पिवळा रुमाल बांधी व पाठीवर लांब सोडून देई. त्याला पाहून मराठा वीराची आठवण होई. एकनाथकडे मी पाहात होतो. तो उंच होता, त्याचे शरीर कसलेले होते. छाती रुंद होती आणि पुन्हा बालसहृश मोकळेपणा!
''तुमच्या शेजारी आम्ही आलो,'' मी म्हटले.
''सकाळी आंघोळीला बरोबर जाऊ,'' एकनाथ म्हणाला.
''कुठे'' मी भीतभीत विचारले. कारण तळयावर आंघोळीला जायची मला भीती वाटत होती.
''झ-यावर!'' तो म्हणाला.
''कुठे आहे झरा? मी आनंदाने विचारले.
''जवळच आहे. तिथे धुवायला वगैरे आसपास दगड आहेत,'' एकनाथ म्हणाला.
''वा, छान. मी येईन,'' मी म्हटले.
''श्याम, चला. आपण सामान आणू,'' सखाराम म्हणाला.
आम्ही सर्व मुलांस नमस्कार करुन गेलो, आम्ही आमचे सामान घेऊन आलो. ट्रंक व वळकटी. जास्त सामान होते कोठे? दोन फे-या कराव्या लागल्या.
माझी खोली मी झाडली. मी पुण्याहून येताना सुंदर हिरव्या स्टँडचा दिवा आणला होता. तेल आणले, दिवा लावला. त्या अंधा-या खोलीत माझा दिवा सुंदर दिसत होता. मी माझे सामान नीट लावले. शिंदीच्या दोन चटया विकत आणल्या होत्या त्या खाली पसरल्या त्यांच्यावर वळकटी ठेवली. बालडी, तांब्या, भांडे, ताट वगैरे बाजूस ठेवले. ट्रंकेवर पुस्तके, वह्या नीट ठेवल्या. भिंतीवर रामाचे सुंदर चित्र टांगले. तुळशीबागेत लहानपणी विकत घेतलेले ते चित्र हाते! त्या खोलीत राम होता. भिंतीवरुन राम माझ्याकडे पाहात होता. रामाच्या मुक्या अध्यक्षतेखाली माझी औंधची यात्रा सुरु झाली.
''श्याम, चल, मी आंबे आणले आहेत,'' सखाराम म्हणाला.
''चल,'' मी म्हटले.
सखारामने खोली व्यवस्थित लावली होती. खोलीत एक दोरी बांधून तिच्यावर त्याने कपडे ठेवले होते. सखाराम जास्त शास्त्रीय बुध्दीचा होता.
''गोड आहेत आंबे,'' मी म्हटले.
''मी फसायचा नाही. तुझ्यासारख्या मी बावळट नाही,'' सखाराम म्हणाला.
''सखाराम, मला बावळट नको म्हणू,'' मी म्हटले.
''खिशात पाकीट ठेवून जाणारा बावळट नाही तर काय?'' तो हसत म्हणाला.