धडपडणारा श्याम 110
'शाळिग्राम आणि ऍक्वर्थ' हयांनी संपादलेले 'ऐतिहासिक पोवाडे' हे पुस्तक जुन्या बाजारात मी विकत घेतले. ते जिवंत काव्य मी मनमुराद प्यालो. १८६० च्या पूर्वीचे 'लोखंडी रस्ते' हे रेल्वेवरील मराठी पुस्तक ह्या बाजारातचे मला मिळाले. इंग्रजी शब्दांना मोठे गमतीचे मराठी शब्द त्या पुस्तकात वापरलेले दिसले. प्लॅटफॉर्म ह्याला 'ओटा', तिकीटाला 'चकती' असे प्रतिशब्द तेथे बनवलेले होते. त्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटले.
'इतिहास आणि ऐतिहासिक' ह्या नियतकालिकाचे असेच कितीतरी जुने अंक तेथे मी खरेदी केले. वेदमूर्ती भाऊशास्त्री लेले हयांच्या 'धर्म' ह्या मासिकातील निवडक लेखांची पुस्तके जुन्या बाजारातून मी खरेदी केली. भाऊशास्त्री म्हणजे प्राचीन विद्येचे चालते-बोलते 'ज्ञानकोश' होते. त्यांना अमुक एक शास्त्र येत नव्हते, असे नाही. मराठी लिहीतही सुंदर व जोरदार. ते एक मोठे विक्षिप्त पुरूष होते. पुष्कळ वेळा विद्वान पुरूष विक्षिप्त असतात. भाऊशास्त्री वाईचे. वाईच्या कृष्णाकाठच्या घाटावर ते जायचे व ब्राह्ममणांकडून वेदमंत्र म्हणून घ्यायचे. असे सांगतात, की जर कोणी चुकला, तर ते थोबाडीतही मारीत. एकदा वाईला हुताशनी पौर्णिमेवर बोलत होते. शिमग्याचे दिवस. ते भाषण करू लागत व वात्रट मुले बोंबा मारीत! शेवटी भाऊशास्त्री कंटाळले व संतापले. ते म्हणाले, ''मारा रे पोरांनो, बोंबा मारा. बोंब मारणं म्हणजेच शिमग्यावरचं व्याख्यान! मी पण मारतो मोठयाने बोंब,'' असे म्हणून स्वत:बोंब मारीत, ते सभेतून निघून गेले!
जुना बाजार म्हणजे माझे विद्यामंदिर होते. जुना बाजार म्हणजे माझ्या मनाला मोठी मेजवानी. माझा वेळ त्या दिवशी मोठया आनंदात जायचा. रविवारी शाळाही नसल्यामुळे, मला भरपूर वेळ पुस्तकांशी खेळीमेळी करीत बसता येई.
मंडईत जाताना विश्रामबाग वाडयासमोर असलेले मराठी ग्रंथ संग्रहालय मी बघत असे. ग्रंथ संग्रहालयाची ती पाटी वाचली, म्हणजे तेथे जायची मला स्फूर्ती येई: परंतु वर्गणीदार झाल्याशिवाय कसे जायचे? शेवटी महिन्याची चार आणे वर्गणी मी भरली! महिन्याची चार आणे वर्गणीही कित्येक वर्गणीदार वेळेवर देत नसत! त्यांचे चहा-चिवडयाचे, पान-तंबाखूचे थोडे का पैसे जात असतील! परंतु सार्वजनिक संस्थांची कोण कदर करतो? त्या चार आण्यासाठी तेथील चिटणीस वर्गणीदारांना कितीदा तरी सांगायचे.
''अहो, तेवढी वर्गणी आणून द्या. तीन महिन्यांची बाकी थकली आहे तुमच्याकडे,'' चिटणीस एका गृहस्थाला एके दिवशी सांगत होते.
''माझी एकटयाचीच का राहिली आहे? का एवढं सतावता? मी काही भिकारी नाही, की तुमची वर्गणी बुडवीन. दीडशे रूपये पगार आहे मला. बुडीत कुळ नाही हे,'' तो गृहस्थ रागाने म्हणाला.
त्याला दीडशे रूपये पगार होता. मग हे चार आण प्रत्येक महिन्याला त्याने वेळेवर का दिले नाहीत? कर्तव्याची जाणीव नाही. सारा उर्मटपणाचा कारभार. सार्वजनिक नीती आपल्या अंगात येईल, त्या दिवशीच आपला उध्दार होईल.
ते संवाद ऐकून मला लाज वाटत होती. मला वाईट वाटत होते. काय ही आमच्या लोकांची दानत, असे मनात आले. त्या दीडशे रूपये पगारदाराकडे मी पाहात होतो. संतापाने व तिरस्काराने पाहात होतो. वाटले, की त्याला धरून गदागदा हलवावे; परंतु त्या ज्ञानमंदिरात तसे करणे योग्य झाले नसते.