धडपडणारा श्याम 72
'' मग काय? श्याम राजकवी होणार!'' तिसरा थट्टेने म्हणाला.'' श्साम तर बोलतच नाही,'' एकनाथ म्हणाला.
'' कवीची हृदयं भरलेली असतात!'' मुजावर म्हणाला.
'' भरलेलं हृदय थोडं ओता ना आमच्यावर,'' तो विनोदी मित्र म्हणाला.
'' मी कविता दिली नाही,'' विषण्णपणे मी सांगितले.
''म्हणजे !'' एकदम सारे उद्गारले.
'' माझी कविता स्वीकारलेली नसती, तर मला मेल्याहून मेलं झालं असतं म्हणून मी ती न देताच परत आलो,'' मी खुलासा केला.
मी तेथून निघून गेलो. दुस-या दिवशी पहाटे मी उठलो. ती माझी सुंदर कविता घेऊन मी झ-यावर गेलो. ती माझी कविता मी झ-याच्या पाण्यावर सोडून दिली! अखंड गाणी गाणा-या त्या प्रतिभावान निर्झरालाच माझी कविता हृदयाशी धरावी. असे वाटले असते. मी झ-यावरून परत येत होतो. वाटेत वामन भेटला.
'' काय श्याम, आज इतक्या लवकर! आमच्या आधी आटपलंस वाटतं स्नान?'' त्याने विचारले.
'' स्नान अजून व्हायचं आहे.'' मी म्हटले.
'' मग इकडे कुठे गेला होतास? बालडी आणायला विसरलास वाटतं?'' त्याने हसून प्रश्न केला.
'' मी आंघोळीच्या आलोच नव्हतो. मी पूजा करायला गेलो होतो,'' मी म्हटले.
'' आंघोळीच्या आधी पारोशाने पूजा? नि इकडे कोणता देव नवीन शोधून काढलास? आम्हांला तरी दाखव म्हणजे रोज आंघोळ करून येताना आम्हीही थोडं पाणी घालून नमस्कार करीत जाऊ,'' तो म्हणाला.
'' हे काव्य आहे व सत्यही आहे काव्य काही खोटं नसतं. झ-याहून मोठा दुसरा कोणता देव आणू? आपण सर्वांना रोज तो
स्वच्छ करतो, आपली घाण तो दूर करतो, जगाला ओलावा देतो. कोणाला नाही म्हणत नाही' कोणावर रागवत नाही, कोणावर रूसत नाही. सर्व जगाला जीवन देतो; पण आपल्याच संगीत समाधीन पुन्हा तल्लीन ! अहंकार नाही, दवंडी नाही. वामन, हा समदृष्टी संगीतसम्राट झरा म्हणजे माझा देव. त्या झ-याची मी आज पुजा करून आलो.'' मी म्हटले.
'' कशाला पूजा केलीस?'' त्याने विचारले.
'' हृदयपुष्पाने! माझ्या कवितेचं फूल त्या निर्झरदेवाला मी वाह्यलं, डोळयांतही अश्रूंचं अर्ध्य दिलं, गंभीर, प्रेमळ, भावभक्तीची पूजा!'' मी म्हटले.
'' ती कविता का पाण्यात फेकलीस?'' वामनने आश्चर्याने विचारले.
'' झ-याकडे खरा, थोर, सहृदय रसिक कोण आहे? ती कविता जगासमोर नेणं म्हणजेच फेकणं झालं असतं, त्या कवितेचा तो अपमान झाला असता. झ-याजवळ नेल्यानेच त्या कवितेचं खरं सार्थक झालं,'' मी म्हटले.
'' वेडा आहेस श्याम तू,'' असे म्हणून वामन निघून गेला. माझे हे वेडेपण, माझ्याजवळून कधीही न जावो, असे म्हणत, मी माझ्या खोलीत आलो.