धडपडणारा श्याम 50
''मला ओळखलंत का?'' मी विचारले.
''श्याम ना तू?'' त्या म्हणाल्या.
''हो,'' मी म्हटले.
'' आता कुठून आलास? औंधला ना तू असतोस? तुझी रामला पत्रं येतात, ती तो मला वाचून दाखवतो. तुझी पत्रं मला फार आवडतात. बस असा उभा का?'' रामची आई प्रेमाने बोलू लागली. इतक्यात रामचा मोठा भाऊ कॉलेजातून घरी आला. मला पाहून तो अगदी आश्चर्यचकित झाला.
'' तू रे इकडे कुठे? पुण्यात तर प्लेग वाढतोय!'' त्याने विचारले.
''पुण्याला शिकायची व्यवस्था होते का, हे पाहायला मी आलो आहे,'' मी म्हटले.
मी रामच्या भावाबरोबर माडीवर गेलो. तेथे आम्ही दोघे बोलत बसलो. मी थोडक्यात त्याला सर्व हकीकत सांगितली. मी मुकाटयाने तेथे बसलो होतो.
''श्याम, तू अगदी वेळेवर आलास बघ. मला कविता करुन दे. मला एका मित्राला पाठवायच्या आहेत. त्याचं अभिनंदन करायचं आहे,'' एकाएकी तो म्हणाला.
''आता मी कविता करु शकणार नाही अगदी चिंतेत आहे मी, अनंता,'' मी म्हटले,
अनंत खाली खायला गेला. मी तेथेच बसलो होतो. मीच लिहिलेली ती पत्रे मीच वाचीत होतो. मी घडयाळ्याकडे पाहात होतो. शाळा सुटून मुले येऊ लागली का, ते खिडकीतून पाहात होतो.,
मुले दिसू लागली. परंतु राम कोठे आहे? शेवटी रामही दिसला, मी खाली बसलो.
रामने आल्याबरोबर माझ्या पाठीत थापटी मारली. मी काही बोललो नाही.
''केव्हा आलास श्याम? आधी पत्रबित्र काही नाही?'' राम म्हणाला.
''अकस्मात येणार येऊन जातो,' एकदम येण्यात मौज आहे. अकल्पित घडण्यात एक विशेष आनंद असतो,'' मी म्हटले.
''चल खाली, आपण काहीतरी खाऊ'' असे म्हणून रामने माझा हात धरुन मला खाल नेले. रामचे इतर तीन धाकटे भाऊ एक पाठची बहीण, सारी तेथे होती. आईने सर्वाना खायला दिले. राम व मी एका ताटात बसलो. पोळी व भाजी खाणे झाले. नंतर राम व मी बराच वेळ बोलत होतो.
''आमच्य इथे राहा तू. आम्ही इतकी आहोत, त्यात तू एक.'' राम म्हणाला.
''खरंच श्याम, तू राहा आमच्यकडे,'' रामचा धाकटा भाऊ म्हणाला.
''मग पुण्याला राहायचं ठरवू?'' मी विचारले.
''बेलाशक, ''राम म्हणाला.
माझ्या इतर अडचणी मी रामजवळ बोललो नाही. 'मला घरून काहीतरी मदत मिळत असेल, ही शिकवणी आहे, मी खाणावळीत जेवीन, इथे फक्त राहीन' असे राम समजत होता; परंतु शिकवणीच्या तीन-चार रूप्यांत माझे सारे कसे भागणार? फी व खाणावळ दान्ही गोष्टी कशा निभणार? ते रामच्या व त्याच्या भावंडांच्याही लक्षात आले नाही.
''बरं मी जातो. त्यांच्याकडून सामान घेऊन येतो,'' मर म्हटले.
मी निघालो; परंतु मी परत न येण्यासाठी जात होतो. मी आता येईन, असे रामाला वाटत होते; परंतु मी निघून जाणार होतो, माझ्या मनाची प्रक्षुब्धता पराकोटीला पोचली होती. मला पुढले काही एक दिसत नव्हते. एका गृहस्थाला रस्त्यात मी धक्का दिला.
''अहो, जरा बघून चला की, ''ते गहस्थ म्हणाले.
''तुम्हीही तेच करा,'' मीही संतापाने म्हटले.