धडपडणारा श्याम 34
''आता रात्रीचा काढायला दिसणारही नाही. तेल-बांधून ठेव, म्हणजे फुगेल मग सकाळी चांगला दिसेल. आण ते ताट, मी नेते,'' असे म्हणून तिने माझ्या हातातले ताट घेतले.
मी घोंगडीवर पांघरुण घेऊन बसलो होतो. गारवा आला होता. म्हातारी माझ्या खोलीत येऊन बसली.
''आज वाचायचं नाही वाटत, श्याम?'' तिने विचारले.
''आज तुमचीच हकीकत सांगा. विटेगावच्या गोष्टी सांगा,'' मी म्हटले.
'' काय सांगू? तू येशील विटेगावला?'' तिने प्रेमाने विचारले.
''तिथे काय आहे?'' मी विचारले.
''तिथे आम्ही दोन पिकली पानं आहोत. आमच्याकडे ये. तिथून पंढरीला जा. आणि श्याम, आमच्या घरी एक मिठू आहे, तो 'विठ्ठल विठ्ठल' म्हणतो. वारकरी दिसले, की आमच्या मिठूचं भजन सुरु होते. पहाट होताच'विठ्ठल विठ्ठल' असा विठूच्या नामाचा गजर मिठू सुरु करतो. आता मिठू म्हातारा झाला आहे. आम्ही म्हातारी, मिठूही म्हातारा,'' ती म्हणाली.
''मग विटयाला त्याची देखभाल कोण करीत असेल? कोण चण्याची डाळ देईल? कोण पेरु देईल?'' मी विचारले.
''तो शेजारच्या भलेदादांकडे ठेवला आहे. ते त्याची आमच्यापेक्षाही चांगली देखभाल करतील. भलेदादांच्या मुलाबाळांना आमच्या मिठूचं फार वेड. लाल-लाल मिरची आणतील नि मिठूच्या लाल-लाल चोचीत देतील. मी मग त्यांना रागवते नि म्हणते, 'मिठूला इतक्या मिरच्या नका रे देऊ,'' म्हातारी सांगू लागली.
''तुमचा मिठू येऊन पाहिला पाहिजे एकदा,'' मी म्हणालो
''आज तुकाराम येणार होता, पण आता येईलंस दिसत नाही,'' म्हातारी म्हणाली.
''दहा वाजायला आले,'' मी म्हटले.
''नीज तू. पण पायावर तेल-पट्टी बांध,'' म्हातारीने मला बजावले.
मी एक चिंधी घेतली नि ती गोडया तेला बुडवून तळपायावर बांधली. मग मी झोपलो. सकाळी मी काटा काढीत होतो, पण तो फारच खोल गेला होता. काही केल्या निघेना.
'' द्रुपदीची आई काढील. श्याम, थांब,'' म्हातारी म्हणाली.
द्रुपदीची आई बाहेर आली. तिने माझा पाय मांडीवर घेतला व ती काटा काढू लागली.
इतक्यात तिचा गुराखी मुलगा आपले काटेकोरणे घेऊन आला. ''आई, हा चिमटा नि हे काटेकोरपणे घे,'' तो म्हणाला.
''खरंच की. आण बघू,'' ती म्हणाली.
दु्रपदीच्या आईने चिमटयाचे तोंड आत घुसवुन काटा ओढून घेतला.
''केवढा आहे!'' म्हातारी म्हणाली.
''ह्याच्यातून मोठे आमच्या पायात जातात,'' द्रुपदीचा भाऊ म्हणाला.
''ह्याच्यावर मी बिब्बा घालतो, म्हणजे पाणी आत शिरणार नाही,'' मी म्हटले
''आहे का भिलावा?'' द्रुपदीच्या आईने विचारले.
''हो. येताना माझ्या आईने बरोबर दिले आहेत,'' मी म्हटले.
इतक्यात तुकाराम आला. मी अंदाजाने ओळखला, तुकाराम म्हणुन.
''काल रात्री येणार होतास ना?'' म्हातारीने विचारले.
''जमलं नाही,'' तुकाराम म्हणाला.
म्हातारीजवळ तुकाराम बसला होता. म्हातारीने त्याच्या तोंडावरुन हात फिरविले तुकारामला रडू आले.
म्हातारीने विचारले,''आज सकाळचा कसा आलास तू?''
''आज चक्की बंद आहे,' तो म्हणाला.