पत्री 114
तेव्हा घडे उन्नती!
उत्साही मुखमंडले भुजगसे दोर्दंड दिव्याकृती
नानापत्ति पथी जरी दिसती ना लोपे यदीया धृती
मोठे कार्य करावयास बघते दिव्या सदा यन्मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।
स्नेहाने भरले परस्पर सदा विश्वास जे दाविती
सर्वांची सहकार थोर करण्यासाठी असे संमती
ऐक्याचे कळुनी महत्त्व न कधी जे मत्सरे भांडती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।
ज्यांच्या निर्भय अंतरी सतत जो सत्स्वाभिमान स्फुरे
ज्यांच्या दृष्टिसमोर जाच जुलमी दुष्ट जनांचा नुरे
भीती एक जगत्पतीस, न दुजा कोणाहि, जे सुव्रती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।
तेजाला कवटाळिती परि सदा जे शिस्त सांभाळिती
अन्याला सुखवावया स्वसुखही नि:शंक जे होमिती
चित्ती उज्वल भावना परि विचाराला न जे सोडिती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।
देशाची अतुला निरंतर वसे भक्ती यदीयांतरी
देशाचे हित ज्यात तीच करिती कार्ये सदा जे करी
भूमातेस्तव जे सदा झिजविती वाणी, वपु, श्री, मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।
देशासाठि सचिंत अन्य कसली चिंता न ज्यांना असे
देशासाठि फकीर नित्य हृदयी ती मातृमूर्ती वसे
सेवा नित्य रुचे, सुचे न दुसरे सेवेत जे रंगती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।
जेव्हा ऐक्य सहानुभूती उदया येतील आम्हांमध्ये
त्यागी उद्यममग्न होतिल यदा, बंधुत्व चित्ति जडे
जेव्हा स्वार्थ असेल दूर, हृदया वाटेल सत्यीं रती
जेव्हा निर्भयता दिसेल नयनी, तेव्हाच राष्ट्रोन्नती।।
-अमळनेर, १९२६
तुफान झालो!
नाही आता क्षणहि जगणे भारती या गुलाम
मारु सारे भय हृदयिचे निर्मू स्वातंत्र्यधाम
नाही एक क्षणहि खपते दास्य विश्वंभराला
स्वातंत्र्याला मिळउन चला जाउन तत्पूजनाला।।
जो या आहे क्षणिक शरिरी अंतिम श्वास एक
भूमातेला सुखविन सुखे होउ मद्रक्तसेक
माता आता क्षणभरिहि ना बंधनी ह्या बसू दे
जावो माझी तनु परि मम म्लान माता हसू दे।।
कैसे साहू? सतत जरि ते आइला नागवीती
कैसे पाहू? सतत जरि ते बंधुंना गांजिताती
बैसावे का विलपत? न का पौरुषाचा स्फुल्लिंग
न श्वानाचे वरु हत जीण, होउ या धीरधिंग।।
झालो का हो सकळ इतुके श्वान पस्तीस कोटी
कैसे दास्यी सतत पिचतो नाहि का त्वेष पोटी
आहो का हो हृदयि बघणे मेष मानूष वा ते
सारे तुम्हां जग भरडिते धान्य ते जेवि जाते।।
आता ओठी मधुरतम त्या गाउ या मातगीता
आता सारे उठुन करु या बंधमुक्त स्वमाता
ना लावावे क्षणहि पळहि भारते मुक्त व्हावे
लोकी आता वर करुनिया मस्तकाते जगावे।।
या रे सारे मिळून करु या आधि ऐक्यावलंब
स्पृश्यास्पृश्ये सकळ उडवू जाळु हे भेददंभ
हालक्लेशा मुळिहि न भिणे स्वीय स्वातंत्र्य घेणे
तेजे पेटू अनलसम ही वैभवी माय नेणे।।
या देहाचे करिल तुकडे राईराईसमान
कोणी क्रोधे तरि सतत मी उंच राखीन मान
ओठी माझ्या प्रियजननिचे दिव्य नाचेल गान
माझ्या मातेस्तव करित हो मी मुदे देहदान।।