पत्री 1
पत्री समर्पण
श्रीराम
अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।
कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।
म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।
पुणे, २८-२-२५ -पां. स. साने
हृदय मदीय तव सिंहासन होवो
हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।
दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।
भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।
-अमळनेर, १९२६