पत्री 10
जीवनतरू
प्रभु! जन्म सफल हा व्हावा
मम जीवनतरु फुलवावा।। प्रभु....।।
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा।। मम....।।
तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली
टवटवित हरित शोभावा।। मम....।।
धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा।। मम....।।
गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा।। मम....।।
बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा।। मम....।।
-धुळे तुरुंग, मे १९३२
मज माहेराला नेई
येइ ग आई
मज माहेराला नेई।।
तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई।। मज....।।
वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई।। मज....।।
सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही।। मज....।।
शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही।। मज....।।
तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही।। मज....।।
वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई।। मज....।।
-धुळे तुरुंग, मे १९३४