पत्री 109
ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जरि मूठभर तरि ना भय
व्हा छातिचे ना बापुडे
व्हा सिंह व्हा नरपुंगव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
खाऊ न केव्हाही कच
माघार शब्द न सापडे
कोशात बोला आमुच्या
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
सेवेत आत्मा ओतणे
मांगल्य-मोक्ष श्रीकडे
हा पंथ एकच जावया
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
स्वार्थी निखारा ठेवुनी
रमतो स्वकर्मी जो मुदे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
शिवते निराशा ज्यास ना
लोभाशि ज्याचे वाकडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
कर्मी अहोरात्र श्रमे
परि मान कीर्ति न आवडे
ते मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
न विलास घे, स्व-विकास घे
निंदादिके जो ना चिडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जे अंबरात उफाळती
ना लोळती शेणी किडे
ते मुक्त होती आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
सर्वत्र करि संचार जो
कोठेच काही ना नडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
करुनी महाकृतिही जया
अवडंबराचे वावडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
शिर घेउनी हातावरी
जो कर्मसमरी या लढे
करि माय अमरा तो निज
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जरि व्हाल योद्धे संयमी
तरी मोक्षफळ हाता चढे
फाकेल भुवनी सु-प्रभा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
-नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३