पत्री 101
प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
राष्ट्र हे दिसे मेलेले
तो भाग्याचा भास्कर अस्ता गेला
अंधार भरुनी उरला
ती सिद्विद्या सकल कला मालवली
दैन्याची पाळी आली
गोकुळे येथली गेली
विपुलता येथली गेली
अन्नान्नदशा ही आली
हे कठिण कसे दिवस असे रे आले
कोणते पाप ते झाले।। प्रभु...।।
श्रीरामांनी भूषविली ही भूमी
सत्त्वाढ्य हरिश्चंद्रांनी
शिबि, मांधाता, राजे येथे झाले
परि दुर्दिन आजी आले
श्रीशिव, बाजी गाजी रणशार्दूल
येथेच खेळले खेळ
ती राजर्षींची भूमी
ती ऋषीश्वरांची भूमी
ती वीरांची ही भूमी
नि:सत्त्व अजी काहि नसे उरलेले
दु:खाचे भांडे भरले।। प्रभु...।।
जरि जगि झालो अस्पृश्य अम्ही सगळे
तरि काहीच चित्ता न कळे
निजबंधूंना दूर लोटितो अजुनी
ठेवितो पशुच त्या करुनी
जरि जग थुंके तरिही श्रेष्ठाश्रेष्ठ
मांडिती बंड हे दुष्ट
उपनिषदे जेथे झाली
तेथेच विषमता भरली
सद्धर्मा ग्लानी आली
हे सनातनी अनृतदेव जणु झाले
माणुसकी विसरुन गेले।। प्रभु...।।
या भूमिमध्ये मरणाचा डर भरला
बाजार किड्यांचा झाला
ती मृति म्हणजे वस्त्र फेकणे दूर
करि गीता जगजाहिर
परि मरणाला भिणार आम्हांवाणी
जगतात कुणी ना प्राणी
जन्मले जिथे अद्वैत
मरणाला तेथे ऊत
ते मोठाले शब्दच ओठी उरले
भयभेद अंतरी भरले ।। प्रभु...।।
बहुभाग्याने नायक गांधी मिळती
परि डरती घरि हे बसती
तो राष्ट्राचा ओढि एकला गाडा
झिजवीत अहर्निश हाडा
तो मूर्त महान यज्ञ, मूर्त तो धर्म
मोक्षाचे दावी वर्म
परि वावदूक हे भितरे
हे भुंकत बसती कुतरे
कुणि कर्मक्षेत्रि न उतरे
हे शब्दांचे पूजक हरहर झाले
दुर्दैव घोर ओढवले।। प्रभु...।।
प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
हलु देत मढी ही सारी
निजकर्तव्या करावयाला उठु दे
मरणास मिठी मारू दे
निज बंधूंना अस्पृश्य न लेखोत
रूढीस दुष्ट जाळोत
तत्त्वांस कृतित आणोत
ओठिंचे करुन दावोत
सद्धर्म खरा आचरुत
ते रुढींचे राज्य पुरेसे झाले
प्रेमाने होवो ओले।। प्रभु...।।
प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
मति जागृत होवो अमुची
प्रभु! येऊ दे गुलामगिरिचा वीट
होउ दे समस्तां धीट
ते हिंदु तसे शीख मुसल्मानादी
होउ दे बंधुसे आधी
विसरु दे क्षुद्रता सारे
विसरोत मागचे सारे
ऐक्याचे खेळो वारे
किति लागे तो त्याग करा रे सगळे
परि ऐक्य पाहिजे पहिले।। प्रभु...।।
प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
करु देत मुक्त निज माता
मन विमल असो, स्वार्थ दुरी राहू दे
निजमाय- कार्य साधू दे
ते होउनिया वेडे मातेसाठी
उठु देत बंधू हे कोटी
घेऊ दे उडी आगीत
घेऊ दे उडी अब्धीत
ओतु दे विष तोंडात
परि मातेचे वदन दिसो फुललेले
मोक्षश्रीने नटलेले।। प्रभु...।।
-अमळनेर, १९२८