पत्री 41
सुखामृताची मग नित्य धार
कळ्या जळीवीण कशा फुलाव्या। दिशा उषेविण कशा खुलाव्या
उचंबळे इंदुविना न सिंधु। तसाच मी त्वद्विण दीनबंधु।।
कशास चिंता परि ही उगीच। जिथे तिथे माय असे उभीच
जिवा कशाला करितोस खंत। जिथे तिथे हा भरला अनंत।।
अनंत नेत्री तुज माय पाहे। अनंत हाती तुज वेढताहे
जरा तुझे तू उघडी स्वनेत्र। दिसेल सर्वत्र पिता पवित्र।।
जरा जरी ते उघडाल दार। प्रकाश तेथे भरतो अपार
हवा शिरे निर्मळ आत खूप। तसेच आहे प्रभुचे स्वरुप।।
करी न तू बंद निजांतरंग। शिरेल तो अंतरि विश्वरंग
सताड ठेवी उघडून दार। सुखामृताची मग नित्य धार।।
-नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३
तुला देतो मी जमिन ही लिहून
जीवनाच्या ओसाड वाळवंटी। कधी करिशिल कारुण्यमेघवृष्टि
कधी झिमझिम पाऊस पाडिशील। वाळवंटांचे मळे शोभतील।।
जीनाची मम पडित ही जमीन। लागवडिला आणील सांग कोण
मला शक्ति नसे कुशलताहि नाही। जगी कोणाचे साह्य तेहि नाही।।
मशागत कर तू पडित वावराची। मला काही नको सर्व घेइ तूची
तुला जे जे प्रभु मनी आवडेल। पडित भूमित या सकळ ते पिकेल।।
मला मोबदला नको एक दाणा। लागवडिला ही पडित भूमि आणा
तुला देतो ही जमिन मी लिहून। मला काहि नको दावि पीकवून।।
मळे होतिल ओसाड वावराचे। पाहुनिया सुखतील नेत्र साचे
जमिन माझी ही फुकट न रे जावी। तुला करुणा एवढी आज यावी।।
-नाशिक तुरुंग, मे १९३३
आशा
संपोनीया निशा। उजळते प्रभा
दिनमणी उभा। राहे नभी
लाखो मुक्या कळ्या। त्या तदा हासती
खुलती डुलती। आनंदाने
ऊर्ध्वमुख होती। देव त्या पाहती
गंध धुपारती। ओवाळिती
तैसे माझे मन। येताच प्रकाश
पावेल विकास। अभिनव
तोवरी तोवरी। अंधारी राहिन
दिन हे नेईन। आयुष्याचे
फुलेल जीवन कळी। केव्हा तरी
आशा ही अंतरी। बाळगीतो
-अमळनेर, १९२८
सोन्याचा दिवस
जन्ममरणांची। पाउले टाकीत
येतो मी धावत। भेटावया
पापांचे पर्वत। टाकूनिया दूर
येतो तुझे दार। गाठावया
दिवसेंदिवस। होउनी निर्मळ
चरणकमळ। पाहिन तूझे
पाहुन पायांस। निवतील डोळे
सुखाचे सोहळे। लाभतील
कधी तो सोन्याचा। येईल दिवस
पुरेल ही आस। अंतरीची
-नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२