पत्री 106
भारतसेवा
प्रिय भारतभू-सेवा सतत करुन
जाईन सुखाने मरुन
जरि मातेचे कार्य न करितिल हात
तरि झणी झडुन जावोत
जरि मातेचे अश्रु न पुशितिल हात
तरि झणी गळुन जावोत
प्रिय बंधूंच्या उद्धृतिच्या कामात
हे हात सदा राबोत
हातांस एक आनंद
हातांस एकची छंद
तोडणे आइचे बंध
हे ध्येय करी करिता, तनु झिजवीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।
जोवरि बंधू पोटभरी ना खाती
ना वस्त्र तदंगावरी
जोवरि त्यांना स्वपरमत्त रडविती
शतमार्गांनी नागविती
जोवरि त्यांना ज्ञानकिरण ना मिळती
अंधारी खितपत पडती
तोवरि न झोप घेईन
अंतरी जळुन जाईन
सौख्यास दूर लोटीन
मी सुखावया झटेन बांधव दीन
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।
या शरिराचे जोडे, भारतमाते!
घालीन त्वत्पदी होते
या बुद्धीला त्वदर्थ मी श्रमवीन
सेवेत हृदय रमवीन
जरि देहाचे करुन, आइ! बलिदान
स्वातंत्र्य येइ धावून
तरि झुगारीन हा जीव
ही तुझीच, आई! ठेव
तव फुलो वदन-राजीव
मी घेत अशी, आइ! तुझिच गे आण
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।
मी प्राशिन गे मृत्युभयाचा घोट
होइन आइ! मी धीट
मी खाइन गे भेदभाव हे दुष्ट
होईन, आइ! गे पुष्ट
मग करण्याते, माते! तुजला मुक्त
सांडिन मी माझे रक्त
त्वच्चिंतन निशिदिन करिन
त्वत्सेवन निशिदिन करिन
सुखगिरिवर तुज चढवीन
मग भाग्याचे अश्रु चार ढाळून
जाईन सुखाने मरुन।। प्रिय....।।
-धुळे तुरुंग, जून १९३२