पत्री 27
आशानिराशा
पतीत खिन्न अति दु:खी उदासीन
तळमळे जीव जैसा जळावीण मीन।।
कोठे जाऊ कोणा पाहू निराधार बाळ
अश्रूंनी ओले झाले माझे दोन्ही गाल
मदीय हृदयात निराशेचा सूर
अंधार सभोवती भरलासे भेसूर
मनोरथमुकुलांचा माझ्या झाला नाश
तिळभर उरलि नाही मला मुळि आस
आकांक्षा स्वप्ने जणू माझी स्वार्थमूल
म्हणून काय आज पडली खात धूळ
भिकारि जरि केली इतकी मी वणवण
रिकामि झोळी माझी जवळ नाही कण
लाजेने मरतो मी दावु कुणा मुख
या जन्मि नाहि जणु मजलागि सुख
कशाला मी राहु जगि फेकु दे हे प्राण
मनी म्हणे असे तोचि ऐकु येइ गान
अनंत सिंधुमध्ये मिळावा फलक
अपार अंधारात दिसावी झलक
तान्हेल्याला लाभावी पाण्याची चुळुक
घामाघूम झालेल्याला वा-याची झुळुक
तसा मला ऐकु आला शब्द मोठा गोड
दाखवु लागला मला माझ्या सौभाग्याचा मोड
‘विकारांची वासनांची तुझ्या झाली राख
आकांक्षा मनोरथ जे जे झाले खाक
त्यातून तो बघ दिसतो येत आहे वर
आशेचा प्रकाशाचा अंकुर सुंदर
भविष्य बघ तुझा सुंदर उज्ज्वल
निराश नको होऊ सोस थोडी कळ
प्रेमाचे पावित्र्याचे पल्लव फुटतील
सेवेची त्यागाची फुले फुलतील
प्रशांत शांतिची फळे लागतील
तुझ्या मनोवृत्ति मुला मोदे डोलतील
पूस पूस अश्रू सारे हास रे बाळा हास
तुझ्या भविष्याचा बघ येतो गोड वास’
कुणि तरि हृदयात बोले असा सूर
‘हुरहुर नको करु बाळा! जाईल दैन्य दूर’
निराशेतून असे येति आशेचे किरण
आशा जाउन पुन्हा घेरि निराशा भीषण
आशानिराशांच्या अशा लाटांवर मीन
खाली वर होइ तुझा, देवा! दास दीन।। पतीत...
-त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१