पत्री 35
करितोस रंगबदल। राया क्षणाक्षणाला
इकडेहि रंग विविध। चढतात मन्मनाला
करितोस रंगफेर। देशी नवा मुलामा
तू दावतोस गोड। जादू मुलांस आम्हां
मोडूनिया क्षणात। रचिशी नवाकृतीस
बघुनी तुझी चलाखी। किती मोद मन्मतीस
गंभीर होइ चित्त। दुस-या क्षणीच हसते
हसले न जो पुरेसे। तिस-या क्षणीच रडते
येती मनी विचार। ते मृत्यु- जीवनाचे
जणु जीव त्या घडीला। दोल्यावरीच नाचे
होताच वासरान्त। होताच भास्करान्त
जणु पूर वैभवाला। चढतो वरी नभात
येता समीप अंत। जीवासही अनंत
ऐसे मिळेल भाग्य। करु मी किमर्थ खंत?
जणु मृत्यु रम्य दार। त्या जीवना अनंत
सौभाग्यहेतु अस्त। करु मी किमर्थ खंती?
श्रीमंत त्या प्रभूचा। मी पुत्र भाग्यवंत
होऊ सचिंत का मी। करु मी किमर्थ खंत?
ऐसा विचार माझ्या। हृदयात गोड येई
माझी महानिराशा। प्रभुजी पळून जाई
जे रंजले प्रपंची। जे गांजले जगात
रिझववयास त्यांना। नटतोसि तू नभात
दारिद्रय दु:ख दैन्य। निंदापमान सर्व
सायंनभा बघोनि। विसरून जाइ जीव
रंगच्छटा अनंत। आकार ते अनंत
करु वर्णना कसा मी। बसतो मुका निवांत
बघतो अनंत शोभा। हृदयी उचंबळोनी
मिटितो मधेच डोळे। येतात ते भरोनि
गालांवरून अश्रू। येतात घळघळोनी
सायंतनीन अर्घ्य। देतो तुला भरोनि
नटतोसि रंगरंगी। तू दिव्य- रूप- सिंधू
तू तात मात गुरु तू। प्रिय तू सखा सुबंधु
राहून गुप्त मार्गे। करितोसी जादुगारी
रचितोसि रंगसृष्टी। प्रभु तू महान चितारी
किती पाहु पाहु पाहु। तृप्ती न रे बघून
शतभावनांनि हृदय। येई उचंबळून
भवदीय दिव्य मूर्ति। केव्हा दिसेल नयनां
भिजवीन आसवांनी। केव्हा त्वदीय चरणां
हे सुंदरा अनंता। लावण्यकेलि-सदना
कधि भेटशील माते। कंदर्पकोटि-वदना।
-नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२