पत्री 65
जीवनातील दिव्यता
आयुष्याच्या पथावर। सुखा न तोटा खरोखर
दृष्टी असावी मात्र भली। तरिच सापडे सुखस्थली
सुंदर दृष्टी ती ज्याला। जिकडे तिकडे सुख त्याला
आशा ज्याच्या मनामध्ये। श्रद्धाही मंगल नांदे
सदैव सुंदरता त्याला। फुलेच दिसतील दृष्टीला
प्रचंड वादळ उठे जरी। गगन भरे जरि मेघभरी
तरी न आशा त्यागावी। दृष्टी वर निज लावावी
वारं शमतिल, घन वितळे। नभ मग डोकावेल निळे
निशेविना ना येत उषा। असो भरंवसा हा खासा
दयासागर प्रभुराजा। सकलहि जीवांच्या काजा
आयुष्याच्या पथावरी। रत्नांची राशी पसरी
दृष्टी असावी परि विमला। फुलेच दिसतील दृष्टीला
माणिकमोती अमोलिक। होती आपण परि विमुख
संसाराच्या पथावरी। माणिकमोती प्रभु विखरी
मुलावरिल ते प्रेम किती। मातेचे त्या नसे मिती
मायलेकरांचे प्रेम। बहीणभावांचे प्रेम
मित्रामित्रांचे प्रेम। पतिपत्नीचे ते प्रेमे
गुरुशिष्यांचे ते प्रेम। स्वामिसेवकांचे प्रेम
माणिकमोती हीच खरी। डोळे उघडुन पहा तरी
तृषार्तास जरि दिले जल। शीतल पेलाभर विमल
क्षुधार्तास जरि दिला कण। हृदयी प्रेमे विरघळून
ज्ञान असे आपणाजवळ। दिले कुणा जरि ते सढळ
कृतज्ञता त्या सकळांचे। वदनी सुंदर किति नाचे
कृतज्ञतेचे वच वदती। तेच खरे माणिकमोती
कृतज्ञतेसम सुंदरसे। जगात दुसरे काहि नसे
रत्ने अशि ही अमोलिक। मागत आपण परि भीक
आयुष्याचे हे स्थान। माणिकमोत्यांची खाण
रत्नजडित मुकुटाहून। त्रिभुवनसंपत्तीहून
अधिक मोलवान हा खजिना। रिता कधिहि तो होईना
कुणास चोराया ये ना। कुणास पळवाया ये ना
माणिकमोती ही जमवा। जीवन सुंदर हे सजवा
प्रभु- हेतुस पुरवा जगती। करी करोनी शुभा कृती
सत्य मंगला पाहून। संसार करु सुखखाण
हृदयी ठेवु या सुविचारी। विश्व भरु या सुखपूरी
काट्यावरि ना दृष्टी वळो। काटे पाहून मन न जळो
आशा अपुली कधि न ढळो। फुलावरिच ती दृष्टि खिळो
सोडून हा मंगल मार्ग। उगीच पेटविती आग
चिंध्या पाहुन ओरडती। आतिल रत्ना ना बघती
उगीच रडती धडपडती। बोटे मोडिति कडकड ती
रागे खाती दात किती। डोळे फाडुन किति बघती
जीवनपट विसकटवून। सुंदर तंतू तोडून
कशास चिंध्या या म्हणती। खोटी दुनिया ते वदती
असे नसे परि जीवन हे। सुखसरिता मधुरा वाहे
सुखास नाही मुळि तोटा। संसार नसे हा खोटा
दृष्टी करावी निज पूत। निराळेच मग जग दिसत
दिसतील मग माणिकमोती। मिळेल सकळा श्रीमंती
ही श्रीमंती सर्वांना। सदैव देतो प्रभुराणा
तत्त्व असे हे मनि आणा। नांदा मोदे ना गाना।।
-अमळनेर, छात्रालय १९२८