पत्री 58
फुलाची आत्मकथा
फुलापरी या जगात सुंदर एक हासरे मुल
दुसरे सज्जनमन कोमल
फुलापरी साजिरे गोजिरे तिसरे तारक वरी
चौथे स्मित सतिवदनावरी
इतुकी पवित्रता कोठली
इतुकी सुंदरता कोठली
इतुकी परिमलता कोठली
निष्पाप अशी फुले शोभती पवित्र आत्म्यापरी
पसरिति मोद धरित्रीवरी।।
फुला पाहुनी सदैव माझे जळते पापी मन
भरती पाण्याने लोचन
स्पर्श कराया धैर्य नसे मज थरथरती मत्कर
लज्जित मेल्यापरि अंतर
माझा स्पर्श विषारी असे
माझी दृष्टी विषारी असे
लावू हात फुलाला कसे
मलिन होउनी जाइल जळुनी हात लागला तरी
ऐसे वाटे मज अंतरी।।
एके दिवशी प्रात:काळी माझ्या मार्गावर
फुलले होते सुम सुंदर
दंवबिंदूंनी न्हाले होते मधुर गंध दरवळे
रविने शतकिरणी चुंबिले
माझी दृष्टि तयावर बसे
वाटे पुढे न जावे असे
पाहुन मज सुम जणु ते हसे
गंगायमुना मन्नयनांतुन आल्या गालांवरी
लज्जा भरली माझ्या उरी।।
फुला पाहुनी मदीय हृदयी विचार शत उसळती
थरथर मदगात्रे कापती
मज्जीवन मज दिसे दिसे ते फूलहि दृष्टीपुढे
भेसुर विरोध आणी रडे
मत्कर सुमना मी जोडिले
खाली निज शिर मी नमविले
भक्तिप्रेमे मग विनविले
‘सुंदर सुमना! सखा, सदगुरु, परब्रह्म तू मम
माझा दूर करी हृत्तम।।
तुला कशाने अशी लाभली सुंदर जीवनकळा
सांगे मजला तू निर्मळा
लहानशा या तुझ्या जीवनी इतुकी निर्दोषता
आली कोठुन वद तत्त्वता
आचरलासी तप कोणते
केले अखंड जप कोणते
सांग स्वकीय जीवनकथे
त्वदीय जीवनरहस्य मजला कळेल बापा जरी
जाइन मीहि तरोनी तरी’।।
बहुत दिसांनी मूल आइला पाडस वा गायिला
भेटे, तैसे होइ फुला
पुलकित झाले, डोलु लागले, प्रेमे वदले मला
“ये ये जवळी माझ्या मुला!
माझा हृदयसिंधु हा अता
करितो तुझ्यापुढे मी रिता
परिसावी मज्जीवन-कथा”
तद्वच ऐकुन कर जोडुन मी स्थिर झालो अंतरी
बोले सुमन बानरीपरी।।
“होतो प्रभुच्या पायांपाशी सदैव मी अंबरी
त्याची कृपा सदा मजवरी
सूर्याच्या सोनेरी करावर बसुनी एके दिनी
आलो प्रभुपद मी सोडुनी
पृथ्वी पाहू आहे कशी
ऐसा मोह धरुन मानसी
सोडुनी आलो मी स्वामिसी
झरझर सरसर नाचत नाचत रविकिरणांचेवरी
उतरु लागे धरणीवरी।।