पत्री 20
तुजवीण अधार मज कोणि नाही
तुजवीण अधार मज कोणि नाही।।
पथ कोण दावील
कर कोण घेईल
नेईल सांभाळुनी कोण, आई!।। तुजवीण....।।
बघतो तुझी वाट
नयनांतानी पाट
गळा दाटतो सांगु तुजलागि कायी।। तुजवीण....।।
हसतात सारे
न दया कुणा रे
दिशा शून्य राया! तुझ्यावीण दाही।। तुजवीण....।।
पथि मी उभा रे
हसतात सारे
मला होटिती, मी रडे धायिधायी।। तुजवीण....।।
जग मत्त हे जात
नत मी उभा तात!
ये हात धरुनी मला नीट नेई।। तुजवीण....।।
कधिही तुझ्यावीण
पद मी न टाकीन
जावो जरी जन्म हा सर्व जाई।। तुजवीण....।।
-पुणे, सप्टेंबर १९३४
काही कळेना, काही वळेना
काही कळेना, काही वळेना।।
निरभ्रशा अकाशात
कुठूनशी अभ्रे येत
झणी सूर्य झाकोळीत
तेज ते पडेना।। काही....।।
जरा वरी येई मोड
कुठूनशी तो ये कीड
खाइ अंकुराला गोड
वाढ ती घडेना।। काही....।।
पतंग जो वरती जाई
तोच उलट वारा येई
क्षणामध्ये गोता खाई
तो वरी चढेना।। काही....।।
मला गमे तोची आला
उठे मिठी मारायला
परी भास सारा ठरला
तो कधी मिळेना।। काही....।।
अशी निराशा ही फार
जीव होइ हा बेजार
लोचनीचि अश्रूधार
ही कधी सुकेना।। काही....।।
-धुळे तुरुंग, एप्रिल १९३४