पत्री 72
दु:ख आनंदरुप
कर्तव्याला करित असता दु:ख आनंदरूप
व्हावे माते, मजसि भरु दे अंतरंगी हुरूप
जावे दु:खे खचुन न, वरी सर्वदा म्या चढावे
व्हावे क्लेशे विचलित न मी, धीर गंभीर व्हावे।।
दु:खे व्हावे जळुन सगळे चित्तमालिन्य खाक
सदभावांची शुभ झळकु दे तेथ लावण्यझाक
दु:खे व्हावे विमलतर मन्मानसांबु प्रसन्न
दु:खे व्हावे स्थिरमति अति स्वांतरंगांत धन्य।।
दु:खे येता, हृदयी भरु दे शाश्वताचा विचार
दु:खे येता, उठुन पुस दे दीननेत्रांबुधार
दु:खे येता सहज मम हा जीव चंडोल व्हावा
जावा ध्यानांबरि उडुनिया दिव्य गानी रमावा।।
दु:खावीणे जगति न असे जीवना पूर्णता ती
दु:खे होते हृदय सरस, प्राणि ते धन्य होती
दु:खे उल्लू मतिस करिती खोल गंभीर धीर
दु:खे दृष्टी विमल करिती नेत्रिं आणून नीर।।
आपत्तीला सतत समजा दूत हा ईश्वराचा
व्हावे ना हो विमुख, करणे नित्य सत्कार तीचा
आशीर्वाद प्रभुजि वितरी देउनी दु:ख- वेष
सत्कारावा मुदित हृदय्, क्लेश मानून तोष।।
-त्रिचनापल्ली फेब्रुवारी १९३१
प्रेमधर्म
हिंदू आणिक मुसलमान ते भांडत होते तदा
राष्ट्रावरती महदापदा
जिकडेतिकडे हाणामारी दंगेधोपे सुरु
माझा जीव करी हुरहुर
परस्परांच्या खुपशित होते पोटामध्ये सुरे
ऐकुन माझे अंतर झुरे
गेले बंधुभाव विसरुन
गेले माणुसकी विसरुन
गेले पशुच अंध होउन
अविवेकाने परस्परांचे कापित होते गळे
माझ्या डोळ्यांतुन जळ गळे।।
खिन्न होउनी, उदास होउनी निराश होउन मनी
बसलो होतो मी त्या दिनी
एकाएकी अन्यत्र मला आहे बोलावणे
नव्हते शक्यच ते टाळणे
सायंकाळी गाडी होती तिकिट तिचे काढुन
बसलो गाडीत मी जाउन
नव्हते लक्षच कोणीकडे
येई पुन:पुन्हा मज रडे
भारति माझ्या का कलिकिडे
विचार नाना काहुर उडवित मानस शोके जळे
प्रभु दे सुमति कधी ना कळे।।
देव मावळे पश्चिमभागी लाल लाल ते दिसे
रक्तच का ते तेथे असे
काय तिथेही खून चालले? रवि का कुणि मारिला?
कुणि तत्कंठ काय कापिला?
भेसुर ऐसा विचार येउन मनि गेलो दचकुन
पाहू लागे टक लावुन
विरले लाल लाल ते परी
तारका चमकू लागत वरी
शांती पसरे धरणीवरी
लाल लाल रुधिरानंतर का शांति जगाला मिळे
काहिच मन्मतिला ना कळे।।
गाडीमध्ये दिवे लागले, तारका वरि जमकले
तिमिरी प्रकाश जगता मिळे
भारतीय जनता हृदयांबरि प्रेमतारकातती
केव्हा चमकु बरे लागती?
प्रेमदीप कधि भारतीय-हृन्मंदिरि पाजळतिल?
केव्हा द्वेष सकल शमतिल?
वरती ता-यांना पाहुन
ऐसे विचार करि मन्मन
मधुनी पाझरती लोचन
खिडकीच्या बाहेरच मन्मुख जे अश्रूंना मळे
डोळे प्रभुचरणी लाविले।।