पत्री 59
खाली खाली जो जो बाळा! येऊ लागलो
तो तो अंध होउ लागलो
विकास गेला, सुगंध सरला, सुंदरता संपली
शंपाहपशी तनु कंपली
तारा अस्मानातुन तुटे
त्याचे तेज उरते का कुठे?
माझा धीर सकळही सुटे
दयासुंदरा वसुंधरेने निजकर केले वरी
झेलुन ठेवी पर्णांतरी।।
अंध जाहलो, बंधी पडलो, अंधार सभोवती
न कळे काय असे मदगती
हाय! हाय! मज मोह कशाला शिवला बोलुन असे
रात्रंदिन मी किति रडतसे
बोले मनात तुज कुणितरी,
‘आता रडुन काय रे परी
तप तू थोर अता आचरी
प्रभुचरणच्युत फुला! विकसास्तव तप तू आदरी
त्याविण गति ना या भूवरी’।।
अश्रु पुसुन मग गंभीर असा निश्चय केला मनी
झालो ध्यानस्थ जसा मुनी
दिव्य असे प्रभुचरण अंतरी दृष्टिपुढे आणुन
गेलो ध्यानमग्न होउन
सगळी बाह्य सृष्टी विसरत
केवळ चिंतनात रंगत
जणु मी प्रभुसिंधुत डुंबत
अशा प्रकारे मुला! तपस्यासमारंभ मी करी
करुनी रडगाणे निज दुरी।।
कधी कधी गज किरणी भास्कर भाजुन तो काढित
कधि ती थंडी गारठवित
मारुन मारुन गाल कोवळे लाल करित मारत
पाउस कधि भिजवुन रडवित
दु:खे हीची हासवतिल
रविकर हेची रंगवतिल
वारे हेची डोलवतिल
प्रभुप्रसादे थबथबलेले दु:ख दु:ख ते वरी
धरिला धीर असा अंतरी।।
जशी तपस्या वाढु लागली विकासही वाढला
तप सद्विकासजननी, मुला!
मंद मधुरसा गंध मदंगी लागे रे यावया
लागे लावण्य फुलावया
वारे देती कधि बातमी
‘सतत बसशिल न असा तमी
वेळ तुझा तू मोदे क्रमी’
तिकडे माझे लक्षच नव्हते, ध्यास एक अंतरी
होवो स्वीय तपस्या पुरी।।
किति दिन रात्री ऐशा नेल्या ध्यानरसी रंगुन
मजला काळाचे भान न
तपस्या करी, आपोआप प्रकटेल विकास तो;
फसतो जो ना विश्वासतो
श्रद्धा अमर असावी मनी
आशा अमर असावी मनी
श्रद्धा जीवन- संजीवनी
श्रद्धा, बाळा! जिवा नाचवी चमत्कारसागरी
देई मौक्तिक अंती करी।।
घाली प्रिय भूमाय सदोदित माझ्या वदनी रस
मज मत्तपस्येत सौरस
सुंदर मज निज पर्णांचा ती आश्रम दे बांधुन
गेलो ध्यानी मी रंगुन
माझी तहानभूकच हरे
माझे भानच मजला नुरे
चिंतन एक मात्र ते उरे
सौंदर्याच्या महान सागरी तन्मय झालो जणू
माझा अहं न उरला अणु।।