पत्री 99
माझी एकच इच्छा
एक मात्र चिंतन आता एकची विचार
भाग्यपूर्ण होईल कधी हिंदभूमि थोर
दु:ख दैन्य जाउन विलया होउ हे स्वतंत्र
जन्मभूमी माझी, ध्यानी मनी हाच मंत्र।।
देशदेवसेवेसाठी सर्वही करीन
चित्त वित्त जीवन माझे सर्व हारवीन
प्राणपुष्प माझे माझ्या मातृभूमिकामी
जरी येइ उपयोगाला कितिक होइ नामी।।
मेघ जेवि जीवन सारे देइ या धरेला
जीवना समर्पुन जाई तो परी लयाला
परार्थार्थ जीवन त्यांचे, तेवि हो मदीय
मायभूमिसाठी माझे सर्व काहि होय।।
कदा तुला पाहिन आई! वैभवी अपार
पारतंत्र्यपंकांतुन तू होशिल कधि पार
चैन ना मुळी मज पडते, घोर हाच माते
त्वदुद्धारकार्यी केव्हा कृति करीन हाते।।
थोडि फार सेवा होवो या मदीय हाती
घडे जरी, होइल मजला सौख्य जीवनांती
याच जन्मि याची डोळा मी तुला स्वतंत्र
बघेन का? न कळे कैसे असे दैव-तंत्र।।
तुझे भाग्य पाहिन डोळा मायभूमि काय?
मम प्राणज्योति आधी मालवेल काय?
असो काहि होवो घेइन फिरुन अन्य जन्म
तुझी करुन सेवा जाइन होउनी सुधन्य।।
जरी देह पडला माझा तरिहि मी फिरून
इथे जन्म घेइन आई निश्चये करून
पुन:पुन्हा त्वत्सेवेचा सदानंद-मेवा
मला मिळो, माते! पुरवा हेतु देव-देवा!।।
पुष्प, पर्ण, तरु, वेली वा शिलाखंड हीन
पशु, प्राणि, पक्षी कोणी सर्प, मुंगि, मीन
कोणताहि येवो मजला जन्म कर्मयोगे
दु:ख नाही त्याचे, परि ते दु:ख त्वद्वियोगे।।
तुझ्या धुलिमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले रामजानकीचे
इथे नामघोषे फिरले संत ते अनंत
तुझ्या धुळीमधला झालो कीट तरि पसंत।।
तुझी धूळ आई प्रेमे लावितो स्व-भाळी
इथे जन्मलो मी म्हणुनी प्रेम-नीर ढाळी
कितीकदा जातो आई हृदयि गहिवरून
राहतो धुळीत पडूनी साश्रु सदगदून।।
तुझ्या धुळीपुढती मजला मोक्ष तुच्छ वाटे
तुझ्या धुळीमध्ये मजला मोक्ष नित्य भेटे
तुझी धूळ म्हणजे आई सर्व भाग्य माझे
तुझ्या धुळीसाठी आई झुगारीन राज्यें।।
तुझा आई! न वियोग मला जन्मजन्मी व्हावा
कोणताहि जन्म मला येवो तो इथेच यावा
सदा तुझ्या चरणांपाशी आइ! मी असेन
स्वर्ग मोक्ष त्यापुढती मी तुच्छ ते गणीन।।
तुझे पवन पावन, आई! तुझे पुण्य पाणी
तुझे निळे आकाश किति स्वच्छ रत्नखाणी
तुझे चंद्र तारे दिसती किति सुरम्य गोड
तुला नसे सा-या भुवनी खचित आई! जोड।।