इस्लामी संस्कृति 87
१९३२ सालीं धुळें तुरुंगांत आम्ही होतों. कोणी तरी पू.विनोबाजींस प्रश्न केला, 'मुहंमदांनीं किती लग्नें केलीं ? सात वर्षाच्या मुलींजवळहि.'
विनोबाजी गंभीर झाले. डोळे चमकले.
"थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळां पालक होणें एवढाच अर्थ होतो. मुहंमदांना का तुम्ही भोगी समजता ? ते असे असते तर दुनिया त्यांना जिंकता आली नसती. गिबन, कार्लाईल वगैरे महान् पंडितांनीं त्यांचीं स्तुतिस्तोत्रें गायिलीं नसतीं. पैगंबर महापुरुष होते. थोर विभूति होते. त्यांचें चरित्र डोळयांसमोर आलें तर माझी समाधी लागायची पाळी येते !'
विनोबाजींचे ते कातर सकंप भावभक्तीनें भरलेले शब्द माझ्या कानांत घुमत आहेत. पैगंबरांच्या चरित्रानें समाधि लागेल ? होय, खरेंच लागेल ! तें दिव्य, भव्य जीवन आहे, अलोट श्रध्देचें, त्यागाचें, क्षमेचें, धैर्याचें संस्फूर्त जीवन आहे. प्रेमळ, निरहंकारी जीवन ! गुलामानें जेवायला बोलावलें तरी जात. रस्त्यांत कोणी भेटला तर हातांत हात देत. आणि त्यानें आपला हात काढून घेतल्यावर आपला हात मागें घेत. परंतु ते आपण होऊन प्रथम आपला हात आधीं मागें घेत नसत. त्यांचा हात अत्यंत उदार होता. त्यांची वाणी अति मधुर होती. त्यांच्याकडे जे जे पहात त्याचें हृदय पूज्यतेनें भरुन येई. जे जवळ येत ते प्रेम करूं लागत. लोक वर्णन करतांना म्हणत, 'असा पूर्वी कधीं पाहिला नाहीं, पुढें असा दिसणार नाही !' किती विशुध्द, प्रेमळ, परंतु शौर्यधैर्यानें संपन्न ! अशा विभूतिविषयीं पूज्यभावच नाहीं तर प्रेमहि वाटतें. वाटतें याच्या पायांहि पडावें व याच्या गळां मिठीहि मारावी. अरब लेखकांना, अब्दुल्लाच्या या मुलाच्या गुणांचे वर्णन करतांना धन्यता वाटते. हृदयाचे बुध्दीचे हे थोर गुण स्तवितांना परम कृतार्थता व अभिमानहि वाटतो.
जे प्रतिष्ठित व मोठे असत त्यांच्याजवळ ते सभ्यतेनें वागत. गरिबांजवळ प्रेमानें वागत. आढयताखोराजवळ धीरोदात्तपणें वागत. सारेच अखेर त्यांना स्तवूं लागले. हृदयांतील त्यांची उदारता मुखावर फुललेली असे. त्यांना अक्षरज्ञान नव्हतें. परंतु निसर्गाचा महान् ग्रंथ त्यांनीं नीट अभ्यासिला होता. त्यांचें मन वाढतें होतें, विशाल होतें. विश्वात्म्याजवळच्या समरसतेनें त्यांचा आत्मा जागृत व उदात्त झालेला होता. पंडित वा अज्ञानी दोघांवरहि त्यांचा प्रभाव पडे. आणि त्यांच्या तोंडावर एक प्रकारची भव्य दिव्यता दिसे. प्रतिभाशाली विभूतिमत्व जणुं त्यांच्या अंतर्बाह्य जीवनांतून स्त्रवत होतें.
इतरांना ते संस्फूर्त करीत. विभूतिमत्त्वाचें हें लक्षण आहे. नम्रता व दयाळुपणा, सहनशीलता व स्वसुखनिरपेक्षता, औदार्य व निरहंकारवृत्ति त्यांच्या वर्तनांत भरलेली होती. सर्वांचें प्रेम ते आकर्षून घेत. जेवायला बसतांना ईश्वराचे आभार मानल्याशिवाय, त्याची कृपा भाकल्याशिवाय रहात नसत. आभार मानल्याशिवाय भोजन करुन उठत नसत. दिवसा जेव्हां प्रार्थनेंत मग्न नसतील तेव्हां पाहुण्यांच्या भेटी मुलाखती घेत. सार्वजनिक कामकाज बघत.
फार झोंपत नसत. बहुतेक वेळ प्रार्थनेंत दवडीत. प्रार्थना त्यांचा प्राण होता. झोपेपेक्षां प्रार्थना बरी, असें ते नेहमी म्हणत. कट्टया शत्रूजवळहि त्यांचें वर्तन उदार व दिलदार असें. त्यांनीं सूड कधींच घेतला नाहीं. राष्ट्राच्या शत्रूंचे बाबतींत अति झालें म्हणजे ते कठोर होत. त्या प्रेमसिंधूला परिस्थितींमुळें कठोर व्हावें लागे. वास्तविक त्यांचें जीवन प्रार्थनामय होतें, प्रभुमय होतें. साधा आहार, झोंपायला कठिण चटई, फाटके कपडे व तुटलेल्या वहाणा शिवणें ! तें वैराग्य, ती अनासक्ति, ती क्षमा, ती ईश्वरार्पणता, तें हिमालयाचें धैर्य ती समुद्राची गंभीरता, ती निरपेक्ष दया, ती सरळता. कोठें पहाल हे गुण ? समुद्राच्या तळाशीं मोठीं मोतीं सांपडतात. महात्म्यांजवळच असे गुण आढळतात.