इस्लामी संस्कृति 21
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यांतून एक शांतदांत मूर्ति हिंडतांना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती मूर्ति दिसे. डोक्यावरील पागोटयावरून एक रुमाल टाकलेला असे. त्याचें एक टोंक उजवीकडून गळयाखालून डाव्या खांद्यावर टाकलेलें असें. कोणाची ती मूर्ति ? कोण ती व्यक्ति? कोण तो पुरुष ? मध्यम उंचीचा, रुंद खांद्यांचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष ? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत. आणि डोकें कसें आहे पहा. भव्य विशाल डोकें ! आदरणीय डोकें ! तोंड जरा लांबट. पिंगट रंगाचें. तांबुस छटेंचें. आणि भिंवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत. आणि दोन भुंवयांच्यामध्ये ती पहा एक ठसठशित शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे. आणि डोळेहि काळेभोर, मोठे. ते डोळे कांही तरी शोधित आहेत, कोठें तरी पहात आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे ! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकहि बांकदार व मोठें आहे. आणि दांत पहा किती स्वच्छ शुभ्र ! दातांची फारच काळजी घेतो वाटतें हा? आणि ती सा-या बाजूनें असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा ! कोणाचा हा ? काय याचें नांव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे. आणि हात पहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. जणुं स्त्रीचे आहेत. पोषाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु द्दढ. जणुं वरून खालीं येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर तर त्यांच्या रस्त्यांत मुलें भेटतांच हास्य फुलतें आहे पहा. वाटेंत मुलें भेटलीं तर त्यांच्या जवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष रहात नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचें राज्य असतें. अद्याप स्वर्गाच्या जवळ तीं असतात. मुलांचेहि त्याच्यावर प्रेम होते. तीं त्याच्याभोवतीं गोळा होत. आपल्या विचारांत मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेंत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदीं हीनदीनाचा का असेना.
कोण होता तो ? लोक त्याला अल्-अमीन म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचें जीवन इतकें आदर्शरूप, सचोटीचें, कष्टाचें, सन्मान्य असें होतें, कीं सर्वांना त्याच्या विषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे कां पहात आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेनें कां पहात आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला पागल म्हणूं लागले. समाजाचीं जुनीं बंधनें तो नष्ट करूं पहात होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतिरिवाज सोडा असें सांगत होता. हा हट्टी माथेफिरू क्रान्तिकारक आहे, असें आतां लोक म्हणत व तो जाऊं लागला म्हणजे संशयानें बघत.
कोण होता तो? ते का मुहंमद पैगंबर? होय होय, तेच ते. शांतपणे रस्त्यांतून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहंमद होते. कुरेशांच्या कुळांत, काबाच्या उपाध्यायांच्या कुळांत जन्मले होते.