इस्लामी संस्कृति 5
या अरबांची संस्कृति भटकी होणें अपरिहार्य होतें. लोकसंख्या वाढे, परंतु झरे थोडेच वाढत. भटकें जीवन त्यांच्यावर लादलें जाई. निसर्गाशी झगडणा-या या लोकांत कांहीं सामाजिक व कांहीं वैयक्तिक गुण आले. संकटांशीं सदैव झगडायचे असे. त्यामुळें त्यांच्यात ऐक्य असे. मालमत्ता व प्राण नेहमीच धोक्यांत. नेहमींच असुरक्षितता. यामुळें ही एकजूट अवश्य असे. परिस्थितीशीं तोंड देण्यासाठी वागणें भाग पडे. परंतु हें एकटें त्या त्या जातिजमाती पुरते असे. इतरांना त्यांना विश्वास नसे. जो आपल्या जथ्यांत नाही. त्याचा भरंवसा कसा धरावा? त्यांचा देशाभिमान म्हणजे विशिष्ट जातिजमातीचा अभिमान. त्यांच्या सामाजिक जीवनाचा आदि व अंत म्हणजे त्याचा जथा! परंतु या गोष्टीचा विकास होऊं लागला म्हणजे अनेक चमत्कार होतात. भाऊ भावांशीं भांडतो, परंतु भावासाठीं इतर सर्वांशींहि भांडावयास तो उठतो. शेजा-याजवळ भांडेल, परंतु शेजा-यासाठी सा-या जगाजवळहि भांडेल. यामुळें अरबांत एक प्रकारचें बळकट अभेद्य कवचहि होतें, ऐक्याचें कवच ! भांडणांतहि ऐक्य होतें. ते एकमेकांजवळ भांडत, एकमेकांसाठी प्राण द्यायलाहि सिध्द असत ! यामुळें न कळत देशाभिमान त्यांच्या अंगी आला. तो त्यांना माहीत नव्हता. मुहंमदांनी त्याची त्यांना जाणीव करून दिली. अरबाच्या वैयक्तिक जीवनांतहि सामुदायिक जीवनाला महत्त्व होतें. आपल्या जातिजमातीशीं निष्ठावंत राहणें हे महान् ऐक्यबंधन असे. बेदुइनांची अनेक कुळें झालीं होती. अनेक कुळांच्या निरनिराळया जाति झाल्या होत्या. आपल्या कुळाचे व आपल्या जमातीचें बळ कमी होऊं नये म्हणून ते फार जपत. माझ्या कुटुंबांतील एखादा मारला गेला तर माझें बळ कमी होऊन शत्रूचें वाढणार नाहीं का? म्हणून बदला घेतलाच पाहिजे. बेरीज वजाबाकी सारी झाली पाहिजे! या वृत्तीमुळें वांशिक भांडणें, द्वेषमत्सर सदैव असत. ही भांडणें थांबविणें कठिण जाई. कारण आपापल्या जातीचा व कुळाचा त्यांत अभिमान असे. कोणा एकाला इजा झाली, अपाय झाला तर सारी जमात सूड घ्यावयास उठे. जमातींतील कोणी एकानें अपराध केला असला तरी सारी जमात त्याची जबाबदारी घेई. एरव्हीं मित्रत्वानें राहणा-या या जातिजमातींत कधीं कुठें लहानशीं ठिणगी पडेल व वणवे पेटतील त्याचा नेम नसे. परंतु आप्तेष्ट होतां होईतों एकमेकांवर उठत नसत. जवळच्या नातलग कुळांपासून अपाय झाले तरी सोशित. ''तेहि आमचेच भाऊ. चांगल्या मार्गावर येतील. सद्बुध्दि येईल. पूर्वी चांगले वागत तसे पुन्हां वागूं लागतील'' असे म्हणत. जातीसाठी दारिद्य पत्करणें, मरण पत्करणें, याचा अभिमान बाळगीत.
त्यांच्या त्यांच्या जातिजमातीचा पुढारी असे. त्याचें म्हणणें सारे मानीत. परंतु हे संबंध मोकळे असत. त्यांत दास्याची यत्किंचितहि छटा नसे. एक तर अरब फार श्रीमंत नसत. एकानें मरावें व दुस-यानें सुखांत लोळावें इतकी विषमता त्यांच्यांत नव्हती. त्यांच्यांतील श्रीमंत म्हटला म्हणजे त्याचा तंबू जरा नीटनेटका असे, पागोटें जरा नीटनेटकें असे, त्याचा एखादा सुंदर उमदा घोडा असे. परंतु समाजावर धोका नसे. पुढा-यांत व त्यांच्यांत जो संबंध असे तो सन्मान्य असे. शेजा-याजवळ, मित्राजवळ जितक्या मोकळेपणानें बोलावें तितक्या मोकळेपणानें तो आपल्या नेत्याजवळहि बोले. शेजा-याची जशी भीति वाटत नसे तुशी पुढा-याचीहि. बेदुइनाची ही जी स्वतंत्र वृत्ति ती पस्थितिजन्य होती. एका कवींने म्हटलें आहे-
''स्वातंत्र्य हें पहाडांवर फुलतें. समुद्रावर फुलतें,'' आपण त्यांत वाळंवटेहि घालूं. वाळवंटांतहि तें फुलतें. अरबस्थानांत जीवनक्रमहि इतका तीव्र असे कीं प्रत्येक मनुष्य स्वतःचा विचार करी, स्वाभिमान-स्वतंत्रा हे गुण त्यामुळें वाढीस लागले. बेदुइन आपल्या मित्रांशी किंवा जमातींशी गोडीनें वागे. परंतु स्वेच्छेनें वागे. त्यांत बळजबरी, सक्ति नसे. तो एक प्रकारें स्वतंत्रतेचा व समानतेचा भोक्ता असे. जो नेता असे, तो गुणांमुळें असे. जो गुणानें व कर्तृत्वानें अधिक त्याला मान देत. वयालाहि ते आदरित. म्हाता-यांच्या हाती सूत्रें देणें सोयींचे पडे. म्हाता-यांविषयीं आदर असल्यामुळे तरुणांतील वैंरें कमी होत, स्पर्धा, मत्सर थांबत. म्हाता-यांस मान दिली जाई तो त्यांच्या अनुभवासाठी, त्याची उपयुक्तताहि असे म्हणून; म्हातारा मोठा बुध्दिप्रधान असे, साधकबाधक प्रमाणें मांडी म्हणून नाहीं. अर्थात् वयाबरोबर पात्रताहि पाहिली जाई. तोच वडील माणूस पुढारी मानला जाई. जो न्यायासाठीं, शौर्यधैर्यासाठीं प्रसिध्द असे. लोक त्याला पुढारी मानीत म्हणून तो पुढारीं. कांहीं विशिष्ट माणसालाहि अरबस्थानांत 'तू'च म्हणत, आदरार्थी 'आपण' किंवा 'तुम्ही' असा प्रयोग नसे. पुढा-यास नांवानें हाक मारीत.