इस्लामी संस्कृति 56
नवशासनतंत्र
मदिनेंत आल्यावर मुहंमदांचें पहिलें काम हें होतें कीं मदिनेमधील सा-या परस्परभिन्न जातिजमातींचें ऐक्य करुन एक लोकसत्ताक राज्य बनविणें. त्यांचें एक संघराज्य करणें. त्यांनीं हक्कांचीं एक सनद दिली. तींत मुसलमानांचीं एकमेकांविषयीं कर्तव्यें तसेंच मुसलमान व ज्यू यांचे अन्योन्य संबंध कसे असावेत यांविषयीं नीट खुलासा केलेला आहे. ज्यूनींहि हा करार मान्य केला होता. ह्या करारावरुन मुहंमदांचें व्यापक व थोर मन, तशीच त्यांची व्यवहारी बुध्दिमत्ता ही दिसून येतात. मुहंमद हे लोकोत्तर बुध्दीचे महान् मुत्सद्दी होते. केवळ विश्वंसक, जुन्याची पाडापाड करणारे नव्हते, तर विधायक वृत्तिहि त्यांच्याजवळ होती. नवीन इमारत बांधणारे ते होते. जुनें नाहीसें करुन नवनिर्मिति करणारे होते. अरबस्थानांत जो कांही मालमसाला मिळाला, ज्या नाना जातिजमाती होत्या, त्यांनाच हाताशीं धरुन माणुसकीच्या विस्तृत व विशाल पायावर ते नवशासन तंत्र निर्मू पहात होते.
'विशाळा पावना बुध्दि । विशाळा सुखकारकी ॥'
ही जी समर्थ रामदासांनीं सांगितलेली बुध्दि तशी मुहंमदांची होती. ही जी हक्कांची सनद किंवा करार त्यांत आहे :
"जो परम दयाळु परमेश्वर, त्याच्या नांवें ही सनद मुहंमद पैगंबर मुस्लिमास देत आहेत. मुस्लिम कोठलेहि असोत, कुरेश असोत वा मदिनेचे असोत, कोणत्याहि ठिकाणीं जन्मलेले असोत, ते सारे मिळून एक राष्ट्र होईल.'
असें लिहून नंतर मुस्लिमांनी एकमेकांशीं कसें वागावें त्याचे नियम दिले आहेत. पुढें ही सनद सांगते :
"शांति वा युध्द कोणतीहि परिस्थिती असो, ती सर्व मुस्लिमांस समान बंधनकारक आहे. स्वत:च्या धर्माच्या शत्रूशीं परभारा तह वा लढाई कोणीहि करावयाची नाहीं. ज्यूहि आमच्या लोकसत्तेंत सामील होत आहेत. तेव्हां त्यांचा अपमान आम्ही होऊं देणार नाहीं. त्यांना कोणी सतावणार नाहीं, याची आम्ही काळजी घेऊं. आमच्या मदतीवर व सदिच्छेवर आमच्या लोकांच्या इतकाच त्यांचाहि हक्क आहे. या यसरिबचे सर्व शाखांचे ज्यू व मुसलमान मिळून एक संयुक्त राष्ट्र होईल. ज्यूंना पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे. त्यांचे पक्षकार व मित्र यांनाहि स्वातंत्र्य आहे, संरक्षण आहे. मात्र जे गुन्हेगार ठरतील त्यांना अवश्य शासन केलें जाईल. सर्व शत्रूंविरुध्द मदिनेचें रक्षण करण्याचे कामीं ज्यू मुसलमानांस मिळतील. हा करार पाळणारांस मदिनेचा अन्तर्भाग पवित्र राहील. मुसलमानांचे व ज्यूंचे जे संरक्षित लोक असतील, दोस्त असतील, तेहि सन्मान्य मानले जातील. जे खरे मुसलमान असतील ते अपराध करणा-यांस, अशांति पसरवणा-यांस, अन्याय्य वर्तन करणा-यांस दूर ठेवतील. अगदीं जवळचा नातलग असला तरी त्याचीहि गय करणार नाहींत.'
यापुढें मदिनेचा अन्तर्गत कारभार कसा चालवायचा त्या संबंधीं लिहून शेवटीं म्हटलें आहे कीं :
"अत:पर जे कोणी हा करार मानतात ते आपलीं सारीं भांडणें ईश्वराच्या आदेशानें त्यांचा निर्णय व्हावा म्हणून पैगंबरांकडे आणीत जातील.'
या करारानें मदिनेंतील भांडणांस मूठमाती मिळाली. आतांपर्यंत जो तो आपल्याच हातीं न्याय घेत असे. सूड घेत असे. अत:पर हें बंद झालें. नवराष्ट्र निर्माण झालें. मुहंमद पहिले न्यायमूर्ति झाले. ते पैगंबर होते म्हणूनहि व लोकांचा नि त्यांचा तसा खरोखरच संबंध होता म्हणूनहि. ज्यूंच्या कांहीं शाखा मदिनेच्या आसपास रहात असत. त्यांचा या करारांत प्रथम अन्तर्भाव नव्हता. परंतु कांहीं दिवसांनीं त्यांनींहि हा करार मान्य केला.