इस्लामी संस्कृति 28
अशीं हीं बिनगाजावाजाची पंधरा वर्षे जात होतीं. स्वत:च्या प्रेमळ मुलग्यांच्या वियोगाची वर्षे, परंतु दुस-यांच्या दु:खाविषयींच्या सहानुभूतींने भरलेली वर्षे. हीं वर्षे जणुं उमेदवारीचीं होतीं. वरुन शांत दिसणारे मुहंमद आंत अत्यन्त अशांत होते. त्यांच्यासमोर जीर्ण शीर्ण विदीर्ण असा अरेबिया होता. जातिजातींत भांडणें. पिढयानुपिढया चालणारीं वैरें. न संपणारे रक्तपात. नानाप्रकारच्या-मुलींना जिवंत पुरुन टाकण्यासारख्या चाली. बायका किती कराव्या त्याला गणतिच नाहीं. नीतीचा धरबंध नाहीं. दारु, जुगार, सारीं व्यसनें बोकाळलेलीं. सर्वत्र अज्ञान व दुष्टता. ईश्वराच्या नांवानें भांडणारे नाना पंथ. ही भांडणे हिजाझच्या द-याखो-यांपर्यंत येऊन पोंचत. अरबी शहरें व गांवें हीं सुध्दां धार्मिक भांडणांनीं पेटत. कांहींनीं जुन्या धर्म-समजुती फेंकून दिल्या होत्या. प्रकाशार्थ त्यांची धडपड होती. त्यांची दोलायमान संशयी स्थिती होती. सर्वत्र अस्वस्थता व अशांतता होती. उत्कटता होती.
अरबस्थानची ही विराट् अशांति मुहंमदांच्या हृदयांत प्रतिबिंबित झाली. मुहंमद गंभीरपणे विचार करूं लागले. त्यांचा आत्मा उड्डाण करूं लागला. सृष्टीच्या गूढ रहस्यांत त्यांचा आत्मा डोकावूं लागला. अनंततेच्या दरींत पाहूं लागला. सत् काय, असत् काय ? जीवन मरण काय ? या विश्वाच्या गोंधळांतहि कांही व्यवस्था आहे का ? मुहंमद शोधूं पहात होते. त्यांना तळमळ लागली. आणि देवाची वाणी त्यांच्या पवित्र उदात्त हृदयानें ऐकली. ती वाणी जगाला नवजीवन देती झाली.