इस्लामी संस्कृति 2
जसें व्यक्तिचे तसेंच समाजाचेंहि. समाजसुध्दां संवयी, रूढि, रागद्वेष यांनींच वागतो. म्हणून समाजांतील रूढि, आवडीनावडी, दंतकथा, भावना, वासनाविकार या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. बुध्दिवादाइतकीच त्यांच्या अभ्यासाचीहि जरूरी असते. समाजाचा इतिहास पाहणा-यानें त्यांच्याकडे तुच्छतेनें पाहतां कामा नये. शास्त्रज्ञाला सोनें किंवा खडू सारख्याच किंमतीची. विचाराच्या तत्त्वज्ञानाच्या उच्च स्वरूपांचा अभ्यास जसा महत्त्वाचा तद्वत् अंधविश्वास, चालीरीति, भोळसट कल्पना, लोकरूढि, दंतकथा यांचा अभ्यासहि महत्त्वाचा. मानवी जीवनावर या सर्वांचा कसाकसा परिणाम होतो हें पाहिलें पाहिजे.
मानवी समाजाचा अभ्यास तीन रूपांत करायचा असतो.
1. भौतिक, भौगोलिक, आर्थिक स्वरूपांत,
2. भावनात्मक स्वरूपांत,
3. बौध्दिक स्वरूपांत.
मानवी सुधारणेचा विचार करतांना बाह्य जीवन, कलात्मक जीवन, वैचारिक जीवन या तिहींचा विचार करावा लागतो. आणि उत्क्रान्तीच्या व क्रांतीच्या द्दष्टीनें करावा लागतो. चौथीहि एक गोष्ट असते. ती म्हणजे आध्यात्मिकता. आपल्या वरील त्रिविध जीवनाचें सार म्हणजे आपली आध्यात्मिकता. म्हणजे भौतिक, भावनात्मक व वैचारिक गोष्टींचा आपल्या मनावर होणारा परिणाम. कोणी म्हणतात कीं वैचारिक स्वरूपांत ही गोष्ट येऊन गेली. परंतु वैचारिक जीवनाच्याहि पलीकडे जाणारी आध्यात्मिकता असते.
संस्कृतीचा सुधारणेचा विचार करतांना बाह्य जीवन, कलात्मक जीवन, वैचारिक जीवन या तिहींचा विचार करावा लागतो. आणि उत्क्रान्तीच्या वा क्रांतीच्या द्दष्टीनें करावा लागतो. चौथीहि एक गोष्ट असते. ती म्हणजे आध्यात्मिकता. आपल्या वरील त्रिविध जीवनाचें सार म्हणजे आपली आध्यात्मिकता. म्हणजे भौतिक, भावनात्मक व वैचारिक गोष्टींचा आपल्या मनावर होणारा परिणाम. कोणी म्हणतात कीं वैचारिक स्वरूपांत ही गोष्ट येऊन गेली. परंतु वैचारिक जीवनाच्याहि पलीकडे जाणारी आध्यात्मिकता असते.
संस्कृतीचा भौगोलिक व आर्थिक परिस्थितीशीं फार निकट संबंध असतो. आपलाच हेका धरणारे अंध लोक कांहीं म्हणोत, मनुष्य हा परिस्थितीचा प्राणी आहे, ही गोष्ट नाकरतां येणार नाहीं. मनुष्य आणखीहि कांही अधिक असतो. परंतु परिस्थितिशरण असतात. एखाद्या विशिष्ट देशांतील संस्था कोणत्याहि असोत. त्या त्या संस्था त्या त्या देशांतील विशिष्ट परिस्थितीमुळेंच संभवल्या असें दिसून येईल. मुहंमदांनी जो धर्म दिला, जे नियम दिले, जी नीति दिली, ज्या संस्था दिल्या त्यांचें स्वरूप नीट समजवण्यासाठीं अरबस्थानची परिस्थिति पाहिली पाहिजे. अरबस्थानांतील परिस्थितीच्या प्रभावळींत मुंहंमदांस पाहूं या, म्हणजे त्यांचे कार्य नीट कळेल. कोणत्या मर्यादांत, कोणत्या लोकांत, कोणत्या प्रदेशांत, कोणत्या परिस्थितींत त्यांना काम करायचें होतें तें पाहूं या.