इस्लामी संस्कृति 61
एकदां बनी आमिर जातीचे दोन नि:शस्त्र लोक मुहंमदांपासून संरक्षण घेऊन जात होते. परंतु मुहंमदांच्या एका अनुयायाकडून चुकीनें ते शत्रुपक्षाचे समजून त्यांतील एक जण मारला गेला. मुहंमदांनीं त्याच्या कुटुंबास नुकसानभरपाई देण्याचें ठरवलें. मदिनेंत मुहंमद 'दियत' म्हणजे नुकसानभरपाईची रक्कम गोळा करुं लागले. ते ज्यूंजवळहि मागायला गेले. परंतु ज्यू टाळाटाळी करुं लागले. इतकेंच नव्हें तर मुहंमदांस दगा करण्याचीं त्यांचीं लक्षणें दिसूं लागलीं. मदिनेंतील लोकसत्तेविरुध्द ज्यू कारवाया करूं लागले. ते बाहेरच्या जातिजमातींनाहि चिथावणी देऊन उठवूं लागले. पैगंबरांनीं दोघांना मरणाची शिक्षा दिली. शहरांत दंगाधोपा होऊं नये, रक्तपात टाळावा, परंतु शासनहि व्हावें या हेतूनें या दोघांचा निमूटपणें अज्ञात माणसाकडून वध करण्यांत आला ! त्या वेळेस कोर्ट, कचे-या, कोर्ट मार्शलें किंवा इतर शांततेच्या काळांतील सुव्यवस्था नव्हती. म्हणून मुहंमदांस असें करावें लागलें. ते फसवून खून नव्हते करवले. तर ती शिक्षा देण्यांत आली होती ! बनी कैनुकाच्या लोकांस मदिनेंतून हाकलून देण्यांत आलें. त्याचें कारण असें झालें कीं एकदां एक मुस्लिम कुमारी बाजारांतून जात असतां एका ज्यूनें तिचा अपमान केला. एका जाणा-या मुस्लिमानें मुलीची बाजू घेतली. तो ज्यू झटापटींत मारला गेला. इतर ज्यू धांवून आले. तो मुसलमानहि मारला गेला. तेथें लढाईच सुरु झाली. मुहंमद तेथें धांवून आले. त्यांनीं सर्वांना शांत केलें. परंतु मदिनेचें वातावरण शांत कसें होणार ? तेव्हां मुहंमदांनीं या ज्यूंना जायला सांगण्याचें ठरवलें. बनी कैनुकाचे लोक हे कारागीर वर्गाचे होते. त्यांची शेतीभाती वगैरे नव्हती. तेव्हां त्यांना जा म्हणून सांगण्यांत कांही नुकसान नव्हतें. परंतु ते मुहंमदांस म्हणाले, 'अरे मुहंमदा, कुरेशांचा पराजय केलास म्हणून चढून जाऊं नकोस. कुरेशांना युध्दकला नीट माहीत नाहीं. आमच्याशीं दोन हात करायची इच्छा आहे का ? ये कर. आम्हीं मर्द आहोंत. तुझी खुमखुमी जिरवूं.' असें बोलून बनी कैनुकाच्या जमातीचे ज्यू आपल्या गढींत जमले व मुहंमदांची सत्ता झुगारते झाले. त्यांनीं बंड उभारलें. मुहंमदांनी त्यांच्या गढीला वेढा दिला. पंधरा दिवसांनीं ते शरण आले. मुहंमद म्हणाले, 'इस्लामी धर्म स्वीकारुन या लोकसत्तेंत सामील होणार असाल तर रहा. नाहींतर मदिना सोडून जा.' ते गेले.
आतां बनी उन-नुझैर या जमातीचे ज्यू राहिले होते. त्यांच्या मनांत शल्य टोंचत होतें. मुहंमद जेव्हां 'दियत' मागायला गेले तेव्हां बरा सांपडला असें त्यांना वाटलें ! मुहंमदांनीं त्यांची हालचाल जाणली व स्वत:स व आपल्या अनुयायांस वांचविलें. मुहंमदांनीं यांनाहि 'मदिना सोडून जा. रहायचें असेल तर इस्लामी होऊन रहा.' असा निरोप पाठवला. त्यांनींहि पूर्वीच्या ज्यूंसारखेच घमेंडी उत्तर पाठविलें. ते आपल्या गढींत एक होऊन बंड करते झाले. मुनाफिकीनाची आपणांस मदत होईल, असा त्यांना भरंवसा होता. परंतु ती मदत मिळाली नाहीं. गढीला वेढा घालण्यांत आला. पंधरा दिवसांनीं शरण आले. मुहंमद म्हणाले, 'रहायचें असेल तर इस्लामी बनून, लोकसत्तेंत सामील व्हा. नाहीं तर जा.' ते जायला निघाले. 'हत्यारांशिवाय बाकीचें सारें तुमचें घेऊन जा.' असें मुहंमदांनी सांगितलें. जाण्यापूर्वी आपलीं घरेंदारें मुसलमानांस उपयोगीं पडूं नयेत म्हणून तीं मोडून मग ज्यू निघून गेले !
मुहंमदांबरोबर मक्केचीं घरेदारें सोडून जे लोक आले होते त्यांना मदिनेंतील मित्रांकडे वांटून देण्यांत आलें होतें. त्यांना घरदार कांही नव्हतें. परंतु या लोकांना हीं ज्यूंची घरें द्यावीं असें मुहंमदाच्या मनात आलें. अनसार जरी या मुहाजिरीनस मदत करीत हाते तरी त्यांची कुचंबणा होत होती. मुहंमद अनसारांस म्हणाले, 'देऊं का ज्यूंचीं घरें, जमिनी व हत्यारें मक्केहून आले त्यांना ?' अनसार आनंदाने म्हणाले, 'द्या द्या. ज्यूंचें द्याच. परंतु तेवढयानें भागणार नाहीं म्हणून आमच्या मालमत्तेंतीलहि त्यांना कांही द्या' मुहंमदांनी मुहाजिरीनांस व अनसारांतीलहि दोघां दरिद्रांस ज्यूंचीं घरेंदारें, शेतीवाडी वाटून दिली. अत:पर अशी रुढीच पडली की, प्रत्यक्ष लढाईत न मिळालेली अशी शत्रूंची मालमत्ता राज्याच्या मालकीची समजावी. ह्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची तें राज्याचा प्रमुख ठरवील.