इस्लामी संस्कृति 34
प्रचारांत प्रखरता
इ.स.६१५ पासून मुहंमद उघड प्रचार करूं लागले. मूर्तिपूजा सोडा असें जाहीरपणें सांगूं लागले. सफा टेंकडीवर त्यांनीं एक सभा बोलाविली. त्या सभेंत मुहंमद मूर्तिपूजेविरुध्द बोलले. मूर्तिपूजेनें त्या महान प्रभूचा अपराध होतो. ईश्वराच्या प्रेषिताचे शब्द न ऐकाल तर पस्तावाल, असें त्यांनीं सांगितलें. ज्यांनीं ज्यांनीं आजपर्यंत देवाच्या पैगंबराचा संदेश ऐकला नाहीं त्यांची कशी दशा झाली, 'याचें त्यांनीं जळजळित चित्र उभें केलें.' ही जुनी पूजापध्दति सोडा. प्रेमाचा, सत्याचा व विशुध्दतेचा नव धर्म घ्या, असें त्यांनीं सांगितलें. कोणत्याहि अरबानें आजपर्यंत दिलें नाहीं तें मी तुम्हांला देतों, या जगींचें सुख व परलोकींचेंहि सुख ! माझ्या या कार्यांत कोण मदत कराल बोला.' त्या सभेंत एका अलीशिवाय कोणीहि उत्साह दाखविला नाहीं ! अली म्हणाला, 'देवाच्या पैगंबरा, मी तुम्हांला मदत करीन.' हें ऐकून सारे मोठयानें खो खो हंसले. सर्वांनीं टर उडविली. टोमणे मारित ते निघून गेले.
परंतु मुहंमदांचा जिवंत ज्वलंत प्रचार सुरु झाला. ती जळजळीत रसरशीत वाणी होती. 'मी तुम्हांला सूचना द्यायला आलों आहे. मी प्रभूचा संदेशवाहक आहें. माझें ऐका. नाहीं तर भेसूर कठोर शिक्षा आहे तुम्हांला ! जोंपर्यंत, अल्लाशिवाय दुसरा देव नाहीं, अल्लाच एक सत्य असें तुम्ही म्हणणार नाहीं, तोंपर्यंत इह वा अन्यत्र तुम्हांला तरणोपाय नाहीं. ईश्वर हे न मानणा-यांना पूर्वी शासन केलें. ज्यांनी नोहाचे ऐकलें नाहीं ते कसे पुरांत गेले ध्यानांत धरा. प्रखर जळजळीत सूर्याची शपथ घेऊन मी सांगतों. रात्रींच्या त्या भव्य तारांकित आवरणाची शपथ घेऊन सांगतों. भव्य उष:कालाची शपथ घेऊन सांगतों. न ऐकाल तर पुढें विनाश आहे. कोणी वांचवणार नाहीं. तो शेवटचा दिवस येईल. सर्वांचा हिशोब होईल. नरकाची आग एकीकडे, एकीकडे अनंत निर्मळ सुखांचा स्वर्ग. काय पाहिजे बोला. सत्य धर्म ऐका.'
असा मुहंमदांचा प्रचार सुरु झाला. त्यांची ती तेजस्वी वाणी, जीवनाच्या श्रध्देंतून येणारी नि:शंक सत्याची वाणी ! श्रोते उचंबळत, रोमांचित होत. तीं ईश्वरी शासनाचीं भयंकर वर्णनें ऐकून श्रोत्यांचा थरकांप होई.
कुरेश आतां घाबरले. या प्रकरणाचा वेळींच बंदोबस्त झाला पाहिजे, असें त्यांना वाटूं लागलें. मामला गंभीर होत चालला. मक्केंतील मूर्ति फुटल्या तर या मंदिरांत कोण येईल ? आणि मग कोठली प्रतिष्ठा, कोठले पैसे, उत्पन्नें ? परंतु मुहंमदांस हात लावण्याचें त्यांना धैर्य नव्हतें. मुहंमद थोर घराण्यांतील होते. जरी गरीबी आली होती तरी त्यांच्या घराण्याविषयीं पूज्यभाव सर्वांस वाटे. चुलते अबु तालिब यांना सारी मक्का पूज्य मानी. ते मुहंमदांचे पालक होते. मानलेले वडील होते. मुहंमदांवर हात टाकणें कठीण. आणि इतरांवर तरी कसा टाकावा ? कारण रक्ताचा सूड ही भयानक गोष्टी होती. एकाचा खून झाला तर त्याची सारी जमात सूड घ्यायला उठे व प्रचंड यादवी माजे.
मक्का शहरांत जे व्यापारी येत त्यांनाहि मुहंमद उपदेश करूं लागले. परंतु हें तर कुरेशांस मुळींच आवडेना मक्केंतील गोष्टी, हे नवीन क्रान्तिकारक विचार बाहेर जाऊं नयेत असें त्यांना वाटे. ते काय करीत, मक्केंत कोणी येत आहे कीं, काय हें आधीं पहात. आणि मक्केच्या बाहेरच त्यांना गांठून म्हणत, 'मक्केंत एक वेडा पीर आहे. त्याचें नांव मुहंमद. तो कांही तरी बोलतो. त्याचें ऐकूं नका बरें.' परंतु हे लोक आपापल्या गांवीं परत जातांना मक्केंतील सारी हकीकत घेऊन जात. एक स्फूर्तिदाता महान् पैगंबर जन्मला आहे असें सांगत. त्याच्या प्राणांवर संकट आहे तरीहि जुना धर्म सोडा असें तो सांगत आहे असें म्हणत. सर्वत्र उत्सुकता वाढली.
मुहंमदांचें निकट आप्तेष्ट त्यांना सोडतील असें कुरेशांस वाटत होतें. परंतु तें खोटें ठरलें. चुलते अबु तालिब पूर्वधर्म सोडायला तयार नव्हते. परंतु मुहंमदांचा हा अकारण छळ पाहून ते संतापत. तें आपल्या एका कवितेंत म्हणतात-