इस्लामी संस्कृति 50
विरोधकांच्या गुप्त मसलती
मुहंमदांची व यसरिबच्या लोकांची जी गुप्त बैठक तिची वार्ता कुरेशांना कळली. सा-या मक्केंत ती बातमी पसरली. कुरेश यसरिबवाल्यांकडे गेले व म्हणाले, 'कोणी कोणी शपथ घेतली सांगा.' परंतु कोणीच बोलेना. कुरेश रागावून परत गेले.
यसरिबचे यात्रेकरु जायला निघाले.
"मी येथले लोक हळूहळू तुमच्याकडे पाठवतों. सारें संपलें म्हणजे शेवटीं मी येईन.' मुहंमद निरोप देतांना म्हणाले.
"पाठवा. या सारे.'
"जे पाठवीन त्यांचें रक्षण कराल ना ?'
"हो करुं. आम्ही कडवे वीर आहोंत. युध्दाचीं बाळें बाहोंत. चिलखती गडी आहोंत. शूर पूर्वजांत शोभेसे आम्ही त्यांचे वारसदार आहोंत. निर्धास्त रहा.'
यसरिबचे लोक गेले. मुसब केला. मक्केंतील वातावरण अधिकच तीव्र झालें. जास्त काळजीपूर्वक पहारा, देखरेख सुरु झाली. कुरेशांचे हेर पाळतीवर असत.
एके दिवशीं मक्केंतील आपल्या अनुयायांस मुहंमद म्हणाले, 'तुम्ही सारे यसरिबला जा. तेथें देवानें तुम्हांला घर दिलें आहे. आधार दिला आहे. तेथें जा. येथें एखादे वेळेस सर्रास कत्तलहि होईल आपली. एकदम नका सारे जाऊं. दोन दोन तीन तीन कुटुंबें अशीं जाऊं देत.'
आणि मक्केंतील इस्लाम घेतलेलीं कुटूंबें यसरिबला जाऊं लागली. इ.स.६२२ मधली ही गोष्ट. दोन महिने अनुयायी जात होते. यसरिब मक्केपासून अडीचशें मैल लांब होते. दगदगीचा कष्टाचा रस्ता. परंतु धन्य त्यांची निष्ठा. शंभर कुटूंबें गेलीं. मोहल्लेच्या मोहल्ले ओस दिसूं लागले. रबियाचा मुलगा ओतबा म्हणाला, 'प्रत्येक सुखी घर आज दु:खी होत आहे. गजबजलेल्या घरांतून आतां केवळ वारे भिरभिर करतील आणि हें सारें आपल्याच भावाच्या मुलामुळें. त्यानें आमच्यांत भेद पाडले, भांडणे निर्मिलीं.'
येशु ख्रिस्त एकदां म्हणाले, 'होय मी शांति देण्यासाठीं नाहीं आलों. मी तरवार देण्यासाठीं आलों. मुलगा बापाच्या विरुध्द जाईल. मुलगी आईच्या विरुध्द जाईल. सून सासूच्या विरुध्द जाईल.'
पैगंबर असें स्वत: म्हणाले नाहींत. परंतु विरोधकांनीं हेंच पैगंबर करीत आहेत असें म्हटलें ! नवीन क्रान्तिकारक विचार जेव्हां जेव्हां येतो तेव्हां तेव्हां असाच देखावा दिसतो. नव्याजुन्याची ओढाताण असते.
आणि सुहैब नांवाचा एक ग्रीक गुलाम होता. तो आतां श्रीमंत झाला होता. नवधर्म घेऊन तोहि यसरिबला जायला निघाला.
"अरे, तूं येथें आलास तेव्हां दीनदरिद्री होतास आणि आतां सारी संपत्ति बरोबर घेऊन निघालास वाटतें ?' त्याचा पहिला श्रीमंत व्यापारी धनी म्हणाला.
"मी संपत्ति सोडली तर जाऊं द्याल ना ? '
"जाऊं देऊं.'
आणि सुहैब सारी संपत्ति सोडून, परंतु धर्माची शाश्वत संपत्ति घेऊन निघाला. मुहंमद म्हणाले, 'फार फायदेशीर सौदा केला सुहैबनें ! ग्रीस देशाची इस्लामला ही पहिली जोड मिळाली.'