Get it on Google Play
Download on the App Store

इस्लामी संस्कृति 77

आणि अरबस्थानांतील जमातीपाठीमागून जमाती नवधर्माच्या स्वीकारार्थ जसजशा येऊं लागल्या तसें मुहंमदांस वाटूं लागलें कीं आपलें अवतारकार्यहि समाप्त होण्याची वेळ आली. मक्केची शेवटची यात्रा करुन यावें असें त्यांचे मनांत आलें. इ.स.६३२ च्या फेब्रुवारीच्या २३ तारखेस ते निघाले. त्यांच्या बरोबर लाख दीड लाख यात्रेकरु होते. 'हज्जत अल-बलाघ' म्हणजे मोठी यात्रा असें हिला नांव आहे. किंवा 'हज्जत-उल-इस्लाम'- इस्लामची यात्रा असें साधें नांवहि आहे. मीनाच्या दरींत यात्रेचे सारे विधि त्यांनीं केले. हे विधि उरकण्यापूर्वी ७ मार्च रोजीं जबल-उल-अरफात या टेकडीवरुन हजारों मुसलमानांसमोर त्यांनीं शेवटचें प्रवचन दिलें. मुहंमद एक वाक्य उच्चारित. तें वाक्य खालच्या लोकांत असलेला पुन्हां उच्चारी. त्यावेळेस ध्वनिक्षेपक नव्हते. सर्वांना ऐकूं जावें म्हणून जिवंत ध्वनिक्षेपक उभे केले होते. तें साधे सरळ प्रवचन होतें.

"बंधूंनो, मी आज सांगतों तें ऐका. कारण आणखी एखादें वर्ष मला लाभेल असें वाटत नाहीं. या जागीं पुन्हां तुमच्यांत मी दिसेन, वावरेन, बोलेन असें वाटत नाहीं. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणें सर्वांचें जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमानें व बंधुभावानें वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करुं. एके दिवशीं ईश्वराच्या न्यायासनासमोर उभें रहावयाचें आहे, हें कधींहि विसरुं नका. त्या दिवसाची नेहमीं आठवण ठेवा. तेथें सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल.

"मित्रांनो, पतीचे पत्नीवर कांही हक्क आहेत, तसेच पत्नीचेहि पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमानें व सहानुभूतीनें वागवा. कठोर नका होऊं. दयाळु रहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनकीवर आपल्या पत्नींचा स्वीकार केलेला असतो. खरें ना ? परमेश्वराच्या शब्दांनें त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरुं नका.

"तसेच तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करूं नका. दिला शब्द पाळा. पाप टाळा. सावकारी निषिध्द आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हें ध्यानांत धरा. पैसे उसने घेणा-यानें घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊं नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळींपासूनच याची अंमलबजावणी सुरु होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेंच घेतील.

"आणि प्राचीन काळापासून तुम्ही जाहिलियत मानीत आलेत. रक्ताचा सूड घेत आलेत. खुनाचा बदला घेत आलेत. परंतु आजपासून तें बंद होत आहे. ही गोष्ट निषिध्द आहे. इस्लाममान्य नाहीं. आजपासून सारी सूडाची भांडणें रद्द झालीं समजा. हारीसाचा मुलगा इब्न रबिया यांचा खून झाला. परंतु त्याचा सूड घेण्यांत येणार नाहीं. माझ्याच आप्तेष्टांपासून हा नवीन नियम सुरु करुं या. (इब्न रबिया लहान असतां दुस-या जमातीच्या ताब्यांत संरक्षणार्थ देण्यांत आला होता. परंतु हुझैल जातीनें त्याचा क्रूरपणें वध केला होता. मुहंमदांचा हा चुलतभाऊ होता.) इब्न रबियाच्या या उदाहरणानें आपण नवीन आरंभ करूं या.

"आणि तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेंच त्यांनाहि खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनीं केला तरच त्यांना सोडा. लक्षांत ठेवा कीं कसेहि झाले तरी तेहि खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेनें नाहीं वागवतां कामा.

"मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हें कधींहि विसरुं नका. तुमचें सर्वांचें एक जणुं भ्रातृमंडळ, एक तुमचा महान् भ्रातृसंघ. जें दुस-याचें आहे तें त्यानें स्वेछेनें खुशीनें दिल्याशिवाय त्याला हात लावूं नका. अन्यायापासून व अन्याय करणा-यापासून दूर रहा. सावध रहा.

"जे येथें आज हजर आहेत त्यांनीं हें सारें गैरहजर असणा-यांस सांगावें. येथें ऐकणा-यापेक्षांहि ज्याला सांगितलें जाईल तो कदाचित् तें अधिकच लक्षांत ठेवण्याचा संभव आहे.'

असें हें प्रवचन बराच वेळ चाललें होतें. साधें, सरळ, कळकळीचें, वक्तृत्वपूर्ण असें तें प्रवचन होतें. भावनाप्रधान श्रोत्यांचीं अंत:करणें उचंबळत होतीं, थरारत होतीं. आणि प्रवचन संपल्यावर पैगंबरांनीं पुढील शब्दांनीं शेवट केला

"प्रभो, मी माझा संदेश दिला. मी माझें कार्य पुरें केलें आहे.'
आणि सभा गर्जती झालीं, 'खरोखरच तुम्ही आपलें कार्य पुरें केलें आहे.' पैगंबर पुन्हां अखेर म्हणाले, 'प्रभो, माझ्या कामाला तुझीच साक्ष. दुसरें मी काय सांगूं ? हीच माझी प्रार्थना.'

ख्रिस्ताचें पर्वतावरील प्रवचन अधिक काव्यमय वाटते. मुहंमदांचें हें पर्वतोपनिषद् साधें आहे. त्यांत गूढ गहन कांहीं नाहीं. साध्या गोष्टी. परंतु रोजच्या जीवनांतील. घरींदारीं कसें वागावें, संसारच सुंदर व सारमय कसा करावा, तें त्यांनीं सांगितलें. सर्वसामान्य लोकांस नैतिक मार्गदर्शनार्थ स्पष्ट व सुबोध दिशा हवी असते. ती स्पष्ट दिशा या प्रवचनांत होती.

इस्लामी संस्कृति

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
इस्लामी संस्कृति 1 इस्लामी संस्कृति 2 इस्लामी संस्कृति 3 इस्लामी संस्कृति 4 इस्लामी संस्कृति 5 इस्लामी संस्कृति 6 इस्लामी संस्कृति 7 इस्लामी संस्कृति 8 इस्लामी संस्कृति 9 इस्लामी संस्कृति 10 इस्लामी संस्कृति 11 इस्लामी संस्कृति 12 इस्लामी संस्कृति 13 इस्लामी संस्कृति 14 इस्लामी संस्कृति 15 इस्लामी संस्कृति 16 इस्लामी संस्कृति 17 इस्लामी संस्कृति 18 इस्लामी संस्कृति 19 इस्लामी संस्कृति 20 इस्लामी संस्कृति 21 इस्लामी संस्कृति 22 इस्लामी संस्कृति 23 इस्लामी संस्कृति 24 इस्लामी संस्कृति 25 इस्लामी संस्कृति 26 इस्लामी संस्कृति 27 इस्लामी संस्कृति 28 इस्लामी संस्कृति 29 इस्लामी संस्कृति 30 इस्लामी संस्कृति 31 इस्लामी संस्कृति 32 इस्लामी संस्कृति 33 इस्लामी संस्कृति 34 इस्लामी संस्कृति 35 इस्लामी संस्कृति 36 इस्लामी संस्कृति 37 इस्लामी संस्कृति 38 इस्लामी संस्कृति 39 इस्लामी संस्कृति 40 इस्लामी संस्कृति 41 इस्लामी संस्कृति 42 इस्लामी संस्कृति 43 इस्लामी संस्कृति 44 इस्लामी संस्कृति 45 इस्लामी संस्कृति 46 इस्लामी संस्कृति 47 इस्लामी संस्कृति 48 इस्लामी संस्कृति 49 इस्लामी संस्कृति 50 इस्लामी संस्कृति 51 इस्लामी संस्कृति 52 इस्लामी संस्कृति 53 इस्लामी संस्कृति 54 इस्लामी संस्कृति 55 इस्लामी संस्कृति 56 इस्लामी संस्कृति 57 इस्लामी संस्कृति 58 इस्लामी संस्कृति 59 इस्लामी संस्कृति 60 इस्लामी संस्कृति 61 इस्लामी संस्कृति 62 इस्लामी संस्कृति 63 इस्लामी संस्कृति 64 इस्लामी संस्कृति 65 इस्लामी संस्कृति 66 इस्लामी संस्कृति 67 इस्लामी संस्कृति 68 इस्लामी संस्कृति 69 इस्लामी संस्कृति 70 इस्लामी संस्कृति 71 इस्लामी संस्कृति 72 इस्लामी संस्कृति 73 इस्लामी संस्कृति 74 इस्लामी संस्कृति 75 इस्लामी संस्कृति 76 इस्लामी संस्कृति 77 इस्लामी संस्कृति 78 इस्लामी संस्कृति 79 इस्लामी संस्कृति 80 इस्लामी संस्कृति 81 इस्लामी संस्कृति 82 इस्लामी संस्कृति 83 इस्लामी संस्कृति 84 इस्लामी संस्कृति 85 इस्लामी संस्कृति 86 इस्लामी संस्कृति 87 इस्लामी संस्कृति 88