इस्लामी संस्कृति 18
या नाना देवदेवतांसमोर स्थांडिलें असत. तेथें पशूंचे बलिदान होई. क्वचित् नरमेधहि होत! वंशपरंपरा चालणारे उपाध्यायवर्गहि होते. जणुं पंडये, बडवे. त्यांना मोठा मान मिळे. परंतु अद्याप त्यांची विशिष्ट जात अशी नव्हती बनली. बाहेर जातिजमातींचे देव असत. परंतु शिवाय प्रत्येकाच्या घरांतहि खाजगी देवघर असे. जणुं कुलदैवत, कौटुंबिक देव. घरांतून बाहेर पडतांना व घरीं परतल्यावर घरांतील देवाला नमस्कार करीत. अशा प्रकारची मुहंमदांपूर्वीची धर्मस्थिती होती. दगड, झरे, धबधबे, तळीं, सरोवरें, पर्वत, सा-यांची पूजा असे. परंतु अरबांना थोडी एकेश्वरी कल्पना येऊं लागली होती. या सर्व देवदेवतांच्या मागें परमोच्च देव कोणी तरी असेल, अशा कल्पना होत्या. चंद्र व इतर देवता ह्या 'अलज-त-आला' च्या मुली. अलज-त-आला म्हणजे सर्वोच्च देर, परमेष्ठी. ज्यू व ख्रिश्चनांशीं संबंध आल्यामुळें ही एकेश्वरी कल्पना आली असेल. ख्रिश्चन व ज्यू धर्माचा फारच मोठा परिणाम अरबांवर झाला होता. अरबांना ज्यूंच्या चालीरीति, विधि, परंपरा सर्व नीट माहीत होतें असें कुराणावरून दिसतें. परंतु ज्यू धर्म संकुचित होता. राष्ट्रीय होता. ख्रिश्चन धर्महि असहिष्णु झाला होता. अरबस्थानच्या सीमेवर हे धर्म होते. खुद्द मक्केंतहि ख्रिश्चन होते. गफार व नेजदान शहरांतून बिशप होते. चर्च होते. अरबांना जो ख्रिश्चन धर्म माहित झाला तो हृदयाचा नव्हता, तर डोक्याचा होता ! आणि हा डोक्याचा धर्म अरबांच्या डोक्यांत उतरेना. ख्रिश्चन धर्मात ख्रिस्ताच्या भौतिक व आध्यात्मिक मूर्त व अमूर्त स्वरूपांचे वाद त्या वेळेस चालले होते. अरबांना तें सारें गूढ वाटे.
सर्वसामान्य अरब हा विशेषसा धार्मिक नव्हताच. तो किस्मतवादी होता, दैववादी होता ! 'किस्मत्' असें गर्जे वतो लढाईत घुसे. नशिबाच्या हातांतील आपलीं जीवनें ! आहे काय नि नाही काय ! कशाला करा फिकीर ! वाटेल तें होवो ! अशू बेछूट व साहसी वृत्ति त्याची होती. तो संशयवादी, अज्ञेयवादी, ऐहिक द्दष्टि, भौतिक वृत्ति होता. कोणी देवदेवतांची परीक्षा घेत. नवस करीत. इच्छेप्रमाणें न झालें तर देवाला नष्टहि करीत ! पुष्कळांचा परलोकांवर विश्वास नव्हता. मेल्यावर पापपुण्याचा निवाडा होणार आहे. असें फारसें कोणी मानीत बसे. कोणी कोणी थडग्यांना उंट बांधून ठेवीत. उंटावर बसून प्रभूच्या न्यायमंदिराकडे प्रेतात्म्यास जातां यावें म्हणून! परंतु असें करणारे-मेल्यावर जन्म मानणारे- अपवादात्मकच होते.
अरब हा कोणत्याच धर्माची फिकीर नव्हता करीत. जे कांही अधिक उन्नत व प्रगल्भ विचारांचे होते त्यांना ख्रिश्चनांच्या चर्चा त्याज्य वाटत. ज्यूंचा अहंकार तिरस्करणीय वाटे. परंतु त्यांना या दगडधोंडयांची, झाडामाडांची पूजाहि आवडत नसे. हा सारा मुर्खपणा आहे असें त्यांना वाटे. या समुद्रकांठच्या अरबांतच अनेक देवदेवतांविरुध्द अप्रीति उत्पन्न झाली. हा धर्म त्यांना रुचेना, पटेना. ज्यू, ख्रिश्चन यांच्या एकेश्वरी विचारानें अरबांतहि वैचारिक जागृति उत्पन्न झाली होती, वाद होत. कुरबुरी, कुरकुरी होऊं लागल्या. एकेश्वरी कल्पनांचीं बोलणीं सुरू झालीं. अस्तित्वांत असलेल्या श्रध्देविषयीं कांहींना असमाधान वाटूं लागलें. या लोकांना हनीफ म्हणजे अज्ञेयवादी म्हणत. हिब्रू शब्द हनेफ असा आहे. त्याचा अर्थ नास्तिक. या हनीफांनीं मुहंमदांसाठी मार्ग तयार करून ठेवला होता. भूमि नांगरली होती. प्रबळ इच्छाशक्तिची महान् विभूति पाहिजे होती. एक प्रकारची धार्मिक अस्वस्थता होती. हनीफांची नकारात्मक भूमिका होती. एक परमेश्वर सर्व सत्ताधीश आहे असें त्यांना वाटे. परंतु त्याची पूजा कशी करायची, त्याला हांक कशी मारायची याचेच वाद होत.