इस्लामी संस्कृति 25
परंतु उरवाझ येथील यात्रेचाहि भंग झाला. अरबांत एक यादवी युध्द माजलें. राष्ट्रीय यात्रेच्या त्या पवित्र महिन्यांत युध्द बंद ठेवण्याची, मानवी रक्त द्वेषमत्सरानें न सांडण्याची सुंदर परंपरा होती. उरबाझ म्हणजे अरबांचे ऑलिंपिया. तेथें कवि, व्यापारी सारे येत. राष्ट्रीय मेळावा जमे. परंतु या युध्दाच्या वेळेस यात्रेच्या दिवसांतहि रक्तपात सुरुच राहिले ! तें धार्मिक बंधन पाळलें गेलें नाहीं. यात्रा झुल्काद मुहंमदहि होते. त्यांनीं आपल्या कुटुंबियांस लढाईत मदत केली. या युध्दाला अधार्मिक युध्द असें म्हणतात. अपवित्र युध्द असें म्हणतात. मुहंमदांवर या युध्दाचा फार परिणाम झाला. आपसांतील हीं कधीं न संपणारीं मरणान्तिक भांडणें पाहून त्याचें हृदय तडफडे. ते विचारमग्न होत.
युध्दाचे दरम्यान एकदां चुलत्यांबरोबर ते सीरियांत व्यापारी काफिल्याबरोबर गेले. मुहंमदांच्या आजोबांनींच दरवर्षीं यमन व सीरियांत मक्केहून कारवान पाठविण्याची पध्दत सुरु केली होती. ती अद्याप होती. या प्रवासांत मुहंमदांनी सामाजिक दु:खें पाहिलीं, ऐकलीं. धार्मिक अध:पात सर्वत्र झालेला पाहिला. सीरियाच्या या प्रवासांतच वाटेंत मुहंमदांनीं जें जें पाहिलें, ऐकिलें, अनुभविलें त्याची स्मृति त्यांच्या हृदयांतून कधींहि गेली नाही.
मुहंमदांच्या घराण्याला आतां गरिबी आली होती. हाशीम व आजोबा, अब्दुल मुत्तलिब यांच्या कर्णासारख्या औदार्यामुळें गरिबी आली होती. पूर्वीची श्रेष्ठ पदवी हळूहळू जाऊं लागली होती. यात्रेकरुंना अन्न देण्याचें काम शेवटी त्यांनी प्रतिस्पर्धी उमैय्या घराण्याकडे सोपविलें. हे उमैय्या हाशीमांच्या घराण्याकडे अत्यन्त मत्सरानें पहात असत.
मुहंमदांना घरचें कामधाम करावे लागे. ते उंटांना चारायला नेत. शेळयामेंढया घेऊन जात. मुहंमद पुढें म्हणत असत, 'ईश्वरानें मेंढपाळांतूनच पैगंबर पाठविले !' उंट व शेळयामेंढया चारतांना ते डोंगरांवर बसत. सृष्टिसौंदर्य पहात. पृथ्वीच्या व आकाशाच्या अनंत सौंदर्यांची भक्ति कुराणांत पदोपदीं आहे. आकाशांत व धरेवर सर्वत्र पहाणारास परमेश्वराच्या खुणा आहेत, असें कुराण पदोपदीं सांगत आहे. परमेश्वराचें ज्ञान मुहंमदांस विश्वव्यापक प्रभूच्या सौंदर्यानेच करुन दिलें असावें. सृष्टि त्यांचा महान् गुरु होता. कुराण म्हणजे विश्वसौंदर्याचा वेद आहे. सृष्टीच्या भव्यतेचे तें उपनिषद् आहे. कुराणांतील भव्य सृष्टिवर्णनांची बीजें या वेळेसच, शेळयामेंढया, उंट चारतांनाच-मुहंमदांच्या हृदयभूमींत पेरलीं जात होतीं.
मुहंमद आतां ऐन तारुण्यांत होते. विशीपंचविशीचें वय. या वेळेस ते पुन्हां सीरियांत कारवानाबरोबर गेले. कुरेश घराण्यांतील एक स्त्री खदिजा. तिच्या मालाचे उंट घेऊन मुहंमद गेले. खदिजा ही दूरची नातलग होती. खदिजा श्रीमंत होती. उदार होती. मुहंमद परत आले. मुहंमदांची कार्यनिष्ठा व प्रामाणिकपणा यांचा खदिजेवर परिणाम झाला. आणि खदिजेचें या काळयाभोर डोळयांच्या तेजस्वी नेकीच्या तरुणावर प्रेम जडलें. ती म्हणाली, 'मुहंमद, माझें तुझ्यावर प्रेम आहे. तूं मला आवडतोस. तुझें माझें नातेंहि आहे. सारे लोक तुला मान देतात. तुझ्याबद्दल त्यांना आदर वाटतो. तूं प्रामाणिक आहेस. तुझें चारित्र्य निर्दोष व सुंदर आहे. स्वभाव गोड आहे. तुझी वाणी नेहमीं सत्यमय असते. खरेंच हो महंमद, यामुळें तूं मला आवडतोस.' आणि त्यांचा विवाह झाला. खदिजेचें वय अधिक होतें. ती गतधवा होती. चाळीस वर्षांची होती. मुहंमद पंचवीस वर्षांचे. परंतु मुहंमदहि आनंदानें लग्नास उभे राहिले !