इस्लामी संस्कृति 79
या वेळेस सहर हा यमनचा गव्हर्नर होता. सहरच्या बापाचें नांव अबाझान. हा पूर्वी इराणचा गव्हर्नर होता. अबाझानने पुढें इस्लामी धर्म स्वीकारला. अबाझानचें त्या प्रांतांत फार वजन होतें. त्याच्यामुळें यमनमधील अरबच नव्हे तर इराणीहि मुस्लिम झाले. अबाझान मरण पावल्यावर त्याचा मुलगा सहर याच्याकडेच पैगंबरांनीं प्रांताधिपत्व ठेविलें होतें.
अल अस्वदनें सहरला ठार केलें. त्याच्या पत्नीशीं बळजबरीनें निका लावला. तिचें नांव मर्झबान होतें. मर्झबाननें एका इराण्याच्या साहाय्यानें अल अस्वद दारुंत असतां त्याचा खून केला !
तुलेह, मोसैलिमा हे आणखी दोघे तोतये पैगंबर उभे राहिले होते. अबु बकरनें त्यांची बंडाळी मोडली. मोसैलिमानें तर मुहंमदांस संदेश धाडिला : 'देवाचा पैगंबर मोसैलिमा याजकडून देवाचे पैगंबर मुहंमद यांस, सलाम. तुमच्या पैगंबरीमध्यें मी भागीदार आहें. आपणा दोघांत पैगंबरी सत्ता वाटली गेली पाहिजे. निम्मी पृथ्वी मला, निम्मी तुम्हा कुरेशांना. परंतु तुम्ही कुरेश बळकावणारे आहांत. तुमच्याजवळ न्याय नाहीं.'
मुहंमदांनीं या पत्रास पुढील खणखणीत जबाब पाठविला :
"कृपावंत मेहेरबान परमेश्वराच्या नांवें : पैगंबर मुहंमदाकडून मोसेलिमास : जे सत्यमार्गानें जातात त्यांना शांति असते. पृथ्वी ईश्वराच्या मालकीची. प्रभूची ज्याच्यावर कृपा होते त्याला तो ती देतो. ईश्वराला जे भिऊन वागतात त्यांचा भविष्यकाळ असतो. त्यांची भरभराट होईल.'
पैगंबर अशा रीतीनें कामकाज पहातच होते. परंतु आतां थकले. प्रकृति फारच बिघडली. अखेरचे दिवस आले. ते अत्यन्त शान्त व गंभीर झाले. त्यांच्या अंत:करणांत 'निर्वाणपर शांति' उचंबळत होती. अशक्त झाले होते तरीहि सार्वजनिक प्रार्थना ते चालवीत. प्रार्थना म्हणजे त्यांचें अमृत होतें. मरणाच्या आधीं तीन दिवसपर्यंत हें काम ते करीत होते. शेवटचे तीन दिवसच हें काम त्यांनीं केलें नाहीं. अबुबकर करीत.
एके दिवशीं मध्यरात्रीं ते उठले. जेथें त्यांचे जुने दोस्त, जुने साथीदार मरुन पडले होते, त्या कबरस्थानांत ते गेले. त्या कबरांना ते भेटले. त्या त्या कबरीजवळ बसून मुहंमद रडले. ते सारे प्रसंग, त्या लढाया त्यांना आठवलें. तें कृतज्ञतेचें, प्रेमाचें श्राध्द होतें. ती पवित्र तिलांजलि होती. किती सहृदय प्रसंग ! कसें कोमल व प्रेमळ ! आपापल्या कबरींत शांतपणें विश्रांति घेणा-या त्या मित्रांना परमेश्वरानें आशीर्वाद द्यावा म्हणून पैगंबरांनीं प्रार्थना केली आणि नंतर घरीं परत आले.
आजारीपणांत आयेषेच्या घरीं ते रहात. कारण तें घर मशिदीच्या जवळ होतें. जोंपर्यंत शक्ति होती. तोंपर्यंत ते प्रार्थना चालवीत. परंतु झपाटयानें शक्ति क्षीण होत होती. एके दिवशीं अली व अब्बासांचा मुलगा फजल यांच्या आधारानें ते प्रार्थनेला आले. यानंतर मशिदींत ते आले नाहींत. मशिदींतील शेवटचें आगमन ! असें सांगतात कीं त्या दिवशीं त्यांच्या मुद्रेवर अनिर्वचनीय असें मंद स्मित झळकत होतें. त्या दिवशीं सभोंवतीचे सारे बोलले, 'किती सुंदर आजचें तुमचें स्मित, किती प्रसन्न व प्रेमळ ही मुद्रा !' कुराणांतील प्रार्थना, स्तुति वगैरे सारें म्हणून झालें. आणि शांतपणें पैगंबर म्हणाले, 'मुस्लिमांनो, कोणाच्या बाबतींत माझ्याकडून कांही अन्याय झाला असेल तर सांगा. येथें त्याचें उत्तर द्यावयास मी उभा आहें. तसेंच जर मी कोणाचें कांहीं देणें असेन तर माझें जें कांहीं कदाचित् असेल तें सारें तुमचेंच आहे.'
एकजण उठून म्हणाला, 'तुमच्या सांगण्यावरुन मी एकदां कोणाला तरी तीन दिरहम दिले होते.'
पैगंबरांनीं लगेच त्याचे तीन दिरहम दिले व म्हणाले, 'या जगांत मान खालीं घालावी लागली तरी हरकत नाहीं. परंतु परलोकीं प्रभूसमोर खालीं मान नको !' सारें शांत झालें. पैगंबरांनी पुन्हां प्रार्थना केली. जे हजर होते, जे शत्रूच्या छळामुळें मारले गेले होते त्या सर्वांसाठीं ईश्वराची कृपा त्यांनीं भाकिली. पुन्हां एकदां सर्वांस सांगितलें, 'वेळच्या वेळेस प्रार्थना करीत जा. धार्मिक व्रतें पाळा. बंधुभावानें वागा. शांतीनें रहा. सदिच्छा बाळगा.' नंतर कुराणांतील (२८:८३) पुढील आयत त्यांनीं म्हटली-
"जे नम्र आहेत, जे अन्याय्य गोष्ट करीत नाहींत त्यांना परलोंकी प्रासाद मिळतील. जे पवित्र व धर्मशील आहेत त्यांना परिणामीं सुख आहे.' हा चरण म्हणून ते घरीं आले. तें शेवटचें प्रवचन, ती शेवटची सामुदायिक प्रार्थना.
परमेश्वराजवळ जाण्याची घटका जवळ येत चालली. इ.स.६३२. जूनची ८ वी तारीख होती. देह गळूं लागला. सोमवार होता. पैगंबर स्वत:शींच प्रार्थना म्हणत होते. प्रार्थना मनांत म्हणत म्हणत प्राण गेले ! थोर पैगंबरांच्या पवित्र आत्महंसानें परमेश्वराच्या पायांशीं कृतार्थ होण्यासाठीं उड्डाण केलें. दुपारची ११ वाजण्याची ती वेळ होती.