इस्लामी संस्कृति 49
"अजूनहि तूं धर्मच्युतच आहेस वाटतें ?'
"मी पैगंबरांचा आहें. इस्लामवर निष्ठा ठेवणारा आहें.'
"मुसब, तूं अबिसिनियांत गेलास. हल्लीं यसरिबला राहतोस. किती कष्ट व दगदग ! तूं घरीं सुखाचें राहणें सोडून असा वनवास कां पत्करतोस ? ते कष्ट का तुला बरे वाटतात ?'
"आई, हें काय सांगत आहेस ? कां मला माझ्या ख-या धर्मापासून वळवूं पहात आहेस ? आणि येथें मला पकडण्याचा तर नाहीना तुमचा बेत ? परंतु मी निर्धारानें सांगतों कीं, माझ्यावर हात टाकील त्याचा मुडदा पाडल्याशिवाय मी राहणार नाही.'
"जा नीघ, माझ्या समोरुन कर तोंड काळें !'
आणि प्रेमळ माता रडूं लागली. तिचें त्याच्यावर फार प्रेम होतें. त्याचा वियोग तिला सहन होत नव्हता. मुसब सद्गदित होऊन म्हणाला, 'आई, ऐकशील ? मी तुला प्रेमाचा सल्ला देतों. ईश्वर एक आहे व मुहंमद त्याचा पैगंबर आहे, अशी शपथ घे. मग तूं-मी एकत्र राहूं शकूं.'
आई म्हणाली, 'त्या चमचम करणा-या ता-यांची शपथ. मी तुझ्या धर्मात शिरण्याचा मूर्खपणा कधीं करणार नाहीं. मीं तुझ्यावर पाणी सोडलें. आजपासून तुझा संबंध सोडला. मी माझ्या धर्माला चिकटून राहीन.'
मुसब निघून गेला.