इस्लामी संस्कृति 67
आपला नवीन धर्म, साधा, सरळ, उदार बंधुभावाचा धर्म, सर्व जगानें घ्यावा असें मुहंमदांस वाटूं लागलें. त्यांनीं अनेक राजेरजवाडयांकडे दूत पाठविले. हा नवधर्मामृताचा पेला घ्या, असें त्यांनीं सर्वांना लिहिलें. ग्रीकांचा सम्राट हिरेक्लिअस व इराणचा खुश्रु पर्विझ यांच्याकडेहि दूतपत्रें देऊन पाठविले. ते पत्र वाचून खुश्रु रागावला. हा कोण बरोबरीच्या नात्यानें लिहिणारा, असें म्हणून त्यानें पैगंबरांच्या पत्राचे तुकडे केले ! तें ऐकून मुहंमद म्हणाले, 'त्याच्या राज्याचे असेच तुकडे होतील !' आणि पुढें लौकरच ती भविष्यवाणी खरी ठरली. ग्रीक सम्राट हिरेक्लिअस यानें पैगंबरांच्या दूतास अधिक चांगल्या रीतीनें वागविलें. पैगंबरांनीं पाठविलेल्या दूताचें नांव अबु सुफियान.
"तुमचे पैगंबर काय शिकवतात ?' ग्रीक सम्राटानें विचारलें.
"एका ईश्वराची पूजा करा. जुन्या मूर्तिपूजेस रजा द्या. गरिबांसाठीं उत्पन्नाचा कांहीं भाग देत जा. सत्यानें रहा. पवित्र रहा. दुर्गुणांपासून दूर रहा. पापांपासून, घाणीपासून दूर रहा. असें पैगंबर शिकवतात.' अबु सुफियाननें उत्तर दिलें.
"त्यांचे अनुयायी वाढत आहेत का ?'
"हो वाढत आहेत. आणि जो एकदां त्यांचा होतो, तो पुन्हा त्यांना कधी सोडित नाहीं.'
या हिरेक्लिअसचा एक मांडलिक राजा दमास्कसजवळ रहात असे. त्याच्याकडेहि इस्लामचा दूत गेला. परंतु त्याचा दुस-या एका मातबराकडून खून झाला ! यामुळेंच पुढें इस्लामचें व ख्रिस्ती राष्ट्रांचें युध्द सुरु झालें.
ज्यूंचा पराजय झाला तरी आसपासच्या ठिकाणाहून ते त्रास देत असत. मदिनेपासून तीन चार दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर अत्यंत तटबंदीच्या बळकट ठिकाणी बनी नझीर व कुरेझा या ज्यू जमाती राहूं लागल्या होत्या. तेथें मजबूत किल्लेकोट होते. या जागेस खैबर म्हणत. खैबर म्हणजे तटबंदीची जागा. खैबरचे ज्यू मुहंमदांवर जळफळत होते. पैगंबरांस खाऊं कीं चावूं करीत होते. या ज्यूंनीं बेदुइनांच्या एका जमातीशीं संयुक्त फळी करण्याचें ठरविलें. बेदुइनांचें शौर्यधैर्य मुसलमानांस माहित होतें. संयुक्त फळी होऊन बेदुइन व ज्यू यांचें संयुक्त सैन्य मदिनेवर चालून येण्यापूर्वीच मुसलमानांचें १४०० लोकांचे सैन्य खैबरवर चालून गेलें ! ज्यूंना कोणाचीहि मदत आली नाहीं. किल्ल्यापाठीमागून किल्ला पडूं लागला. शेवटी ज्यू शरण आले. ज्यूंना त्यांची शेतीवाडी, घरदार सारें ठेवलें गेलें. त्यांचें धार्मिक स्वातंत्र्यहि राखण्यांत आलें. परंतु अत:पर त्यांचें रक्षण मुस्लिम सत्ता करणार, यासाठी ज्यूंनीं कर द्यावे असें ठरलें. ज्यूंची जंगम मालमत्ता तेवढी घेण्यांत आली. ती मुसलमानांत वांटली गेली. घोडेस्वारास तीन भाग तर पायदळ शिपायास एक भाग याप्रमाणें सर्वांस भाग दिला गेला. याच वेळेस एका ज्यू स्त्रीने मुहंमदांस विष चारण्याचा प्रयत्न केला होता. मुहंमदांचा एक अनुयायी मेलाच. परंतु मुहंमद वांचले. त्यांच्या शरीरावर विषाचा परिणाम झाला. या वेळेपासून त्यांची प्रकृति बिघडली. आणि नेहमीं त्रास होत असे. मुहंमदांनी या स्त्रीस क्षमा केली. तिच्या लोकांत तिला सुखरुप राहूं दिलें.