इस्लामी संस्कृति 64
अपार उदारता
ज्यूंचा निकाल लागला. परंतु आसपासचे बेदुइन आतां सतावूं लागले. त्यांचा बंदोबस्त करण्याचें काम सुरु झालें. या सुमारासच सिनाई पर्वतावरील सेंट कॅथेराइन मठाला व सर्वच ख्रिश्चन लोकांना मुहंमदांनीं जी सनद दिली ती सुप्रसिध्द आहे. जगाच्या इतिहासांतील ती अपूर्व सहिष्णुता होती. विशेषत: सेमिटिक धर्मांमध्यें तरी ही वस्तु नि:संशय अपूर्व होती. ख्रिश्चनांना त्यांच्या स्वत:च्या धर्माच्या राजांकडूनहि ज्या सवलती मिळाल्या नाहींत त्या मुहंमदांनीं दिल्या. आणि 'जो कोणी मुस्लिम मी दिलेल्या या आज्ञापत्राविरुध्द वागेल तो धर्मच्युत समजला जावा. ईश्वरी आज्ञेचा भंग करणारा मानला जावा' असेंहि त्यांनीं जाहीर केलें. 'ख्रिश्चनांचा सांभाळ करणें, त्यांच्या मंदिरांचें, चर्चेस्चें रक्षण करणें, त्यांच्या धर्मोपदेशकांचीं वसतिस्थानें रक्षिणें; सर्व अपायांपासून सांभाळणें, अन्याय्य कर न बसविणें, कोणत्याहि बिशपला वगैरे न काढणें, कोणाहि ख्रिश्चनास स्वधर्मत्याग करावयास भाग न पाडणें, मठांतून ख्रिश्चन साधूंस न हांकलणें, यात्रेपासून कोणाहि यात्रेकरुस न रोखणें, ख्रिस्ती धर्मीयांचीं घरें वा चर्च यांचा मशिदीसाठीं उपयोग न करणें, मुस्लिमांशीं ख्रिश्चन स्त्रियांनीं लग्नें केलीं तर त्या स्त्रियांना स्वत:चा धर्म पाळण्याची मुभा असणें, धर्माची सक्ति न करणें, ख्रिश्चनांस स्वत:चे मठ वा चर्च यांच्या दुरुस्तीसाठीं मदत लागली तर ती देणें, त्यांच्या इतरहि धार्मिक गोष्टींस साहाय्य हवें असेल तर तें देणें, परंतु याचा अर्थ त्यांच्या धर्मात आपण सामील झालों असा कोणी करुं नये, त्यांच्या गरजेसाठी त्यांना आपण मदत दिली इतकाच याचा अर्थ. बाहेरच्या ख्रिश्चनांशीं लढायी चालू असली तरी स्वत:च्या देशांतील ख्रिश्चनांस ते केवळ ख्रिश्चन आहेत म्हणून त्रास देऊं नये. जर कोणी त्यांना त्रास देईल तर तो पैगंबरांस कमीपणा आणील !'
किती सुंदर ही हक्काची सनद. मुहंमदांचा अंतरात्मा किती थोर होता. येशू ख्रिस्ताविषयीं त्यांना अत्यंत पूज्यबुध्दि वाटे. तसेंच ते सर्व शेजा-यांशी गुण्यागोविंदानें राहूं इच्छित होते. ख्रिश्चन धर्मांत नाना चर्चा चाललेल्या होत्या व कत्तली होत होत्या. अशा वेळेस ते जर मुस्लिम राज्यांत राहावयास आले तर त्यांना केवढें आश्वासन !
अपकारांची फेड अपकारानें करण्याची शक्ति असतांहि जो दया दाखवितो तोच खरा महात्मा. मुहंमद शासनाधिकारी या नात्यानें स्टेट चालवणारे, जनतेच्या मालमत्तेचे व जीविताचें, जनतेच्या स्वातंत्र्याचे वाली या नात्यानें न्याय देतांना अपराध्यास कठोरपणें शासनहि करीत. परंतु पैगंबर या नात्यानें, ईश्वराचे प्रेषित या नात्यानें ते केवळ क्षमामूर्ति होते. मोठयांतल्या मोठया शत्रूसहि ते क्षमा करीत. न्याय व दया यांचें मधुर मिश्रण त्यांचे ठायीं होतें.
मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥