इस्लामी संस्कृति 19
हे हनीफ निश्चित मार्गदर्शन करूं शकत नसत. बहुजन-समाजापासून हे विचार दूर राहिले. मुहंमदांनी या हनीफांच्या विचारांतच प्राण ओतला. या हनीफांचा एक पुढारी होता. त्याचें नांव झैद इब्न अम्र. मुहंमद त्याच्याकडे अनेकदां जात. दुसरा होता त्याचें नांव वरका होतें. मुहंमदांचा तो नातलग होता व शेजारी रहात असे. या एकेश्वरी मताच्या लोकांजवळ मुहंमद नेहमीं बोलत. ज्या महापुरुषानें नवधर्म देऊन, इस्लाम देऊन अरबस्थानचा नवा मनु सुरू केला, अरबस्थानचा कायापालट ज्यानें केला त्याचे अग्रदूत हे हनीफ होते. त्यांनीं धार्मिक उत्कटता सर्वत्र पसरून ठेवली होती. सा-या अनिश्चित अशा त्या वातावरणांत कोणी तरी मार्गदर्शक तारा येईल, अशी आशा फुलत होती. पूर्वी आद, समूद वगैरे जातींत देवांनें प्रेषित पाठविले, पैगंबर पाठविले. आपल्यांतहि येईल, असें मुहंमदांपूर्वीच लोकांना वाटूं लागलें होतें. कांही तरी चमत्कार लौकरच होणार आहे, असें वाटत होतें. अवतार येणार प्रेषित येणार ! बायकांना वाटे आपणांस मुलगा व्हावा व आपण त्या पैगंबराची आई व्हावें ! तो येणारा महापुरुष आपल्या पोटीं यावा, असे मातांना वाटत होतें.
असा हा इस्लामपूर्व अरेबिया होता. असा अंतर्गत भागांतील बेदुइन व समुद्राजवळचा, सुपीक प्रदेशांतील अरब. या दोहोंत जरी फरक असला तरी दोघांतहि स्वभावसाम्य होतें. अरब मग तो अन्तर्गत भागांतील असो व सुपीक प्रदेशांतील असो, तो स्वातंत्र्याचा उत्कट प्रेमी होता. तो शूर होता. निर्भय व उदार होता. तो दिलेलें वचन पाळी, आतिथ्यांत दक्ष राही. तो वाळवंटांचें खरें बाळ होता. अशा भावनाप्रधान लोकांत, निर्भय करारी लोकांत, मुहंमद आले. आणि मुहंमदांनी त्यांच्या गुणांना आपसांतील रत्तपातांतून काढून महान् कार्याकडे वळवलें. जी अरबी शत्तिच् रत्तपातांत खर्च होत होती ती महान् ध्येयाकडे त्यांनी वळवली. अरबांना जगाचें मार्गदर्शक केलें. जगाची संस्कृतीची मशाल मुहंमदांनी अरबांच्या हाती दिली. त्या थोर पैगंबरांचे चरित्र आतां आपण आधीं पाहूं या.