इस्लामी संस्कृति 76
अखेरचा उपदेश
मुहंमदांचें जीवन म्हणजे उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मांनीं खच्चून भरलेलें असें हें पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनीं चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणा-यांस त्यांनीं एक केलें. अमर जीवनाच्या आशेनें कर्तव्यकर्म करण्याची त्यांनीं प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्तत: पडलेलें किरण केंद्रीभूत व पुंजीभूत करुन त्यांनीं प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला. आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर ! थांबणें नाहीं. तडजोडीस वाव नाहीं. अप्रतिहृत धैर्यानें हा महापुरुष सारे अडथळे झुगारुन पुढेंच जात राहिला. त्यांनीं परिणामांची दरकार कधींच बाळगिली नाहीं. ईश्वरावर श्रध्दा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वत:चा जणुं संपूर्ण विसर त्यांना पडला होता. ख्रिस्ताने निराकार प्रभूचा धर्म दिला. परंतु त्या धर्मांत मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेंत चुस्त गढून गेलेल्या अरबांस या न पढलेल्या फकीरानें इतक्या प्रखरतेनें ईश्वराची एकता पटविली कीं ती वज्रलेप झाली. ज्यांनीं ज्यांनीं म्हणून पैगंबरांची वाणी एकदां ऐकिली, त्यांच्या मनावर ईश्वराचें अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय रहात नसे.
मुहंमद समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेनें, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुध्दीनें बंड करावें म्हणून तो इषारा होता. त्यावेळेस जुलमी संस्था व भांडकुदळ पंथ यांचा बुजबुजाट झाला होता. दुर्बोध चर्चांत मानवी आत्मा गुदमरत होता. आणि मानवी शरीर वतनदारांच्या वर्चस्वाखालीं तुडविलें जात होतें. परंतु पैगंबर आले. त्यांनीं हीं मिरासदारीचीं भिंताडें साफ पाडलीं. विशिष्ट हक्क त्यांनीं नष्ट केले. स्वार्थी लोकांनीं ईश्वराकडे जावयाच्या रस्त्यावर जीं जाळीं विणून ठेविलीं होतीं तीं पैगंबरांनीं आपल्या जोरदार फुंकरीनें नष्ट केलीं. रस्ता साफ मोकळा झाला. 'परमेश्वराजवळ तुम्ही सारे निर्धास्तपणें जा. तेथें सारे समान. तेथें कोणाला जादा अधिकार नाहींत. पैगंबर स्वत: पंडित नव्हते. परंतु ज्ञानविज्ञानाची महती त्यांनीं गायिली आहे. मानवी इतिहास लेखणीनें लिहिला जातो. लेखणीनें मानवाचा निवाडा केला जातो. न्याय दिला जातो. मानवी कृत्यांची छाननी करणारें, ईश्वराच्या दृष्टीनें छाननी करणारें साधन म्हणजे लेखणी. लेखणी म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय सारें फोल आहे. शिका, वाचा, पहा.' असें मुहंमद सांगतात.
ते बुध्दीवर फार जोर देत. आश्चर्ये, चमत्कार असल्या प्रकारांना ते कधींहि उत्तेजन देत नसत. भोळसरपणा व बावळटपणा त्यांना पसंत नव्हता. ईश्वरी शासनाविषयींची जी त्यांची कल्पना होती ती सर्वांना समान प्रवेश देणारी होती. पैगंबरांचा ईश्वर लोकशाहीचा भोक्ता आहे. तो कोणी हुकूमशहा नाहीं.
मुहंमदाचें धार्मिक ध्येय व्यापक आहे. त्यांची मानवता साधी व सरळ आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे मुहंमदांचें पूर्वीच्या धर्माचार्यांपेक्षां विशिष्टत्व दिसतें. ते जणु अर्वाचीन महर्षि आहेत, असें वाटतें. त्यांचें जीवनकार्य उघडें आहे, स्पष्ट समोर जगाच्यापुढें आहे. त्यांत गूढता नाहीं. अस्पष्टतेंत तें लपेटलेलें नाहीं. त्यांच्या व्यक्तित्वाभोंवतीं पुराणें रचिलीं गेलीं नाहींत, दंतकथा गुंफिल्या गेल्या नाहींत.