इस्लामी संस्कृति 75
पैगंबरांचें जीवनकार्य आतां संपलें होतें. रानटी लोकांतून नव संस्फूर्त असें संघटित राष्ट्र त्यांनीं निर्माण केलें. त्यांना ईश्वरी ज्ञान देऊन कृतार्थ केलें, पवित्र केलें. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातांत रंगणारे असे अरब होते. त्यांना 'तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय परमेश्वर भजा' असें ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनीं एकत्र केलें. फाटलेल्या अरबांना जोडलें. बंधुभावानें बांधलें. संघटित केलें. अनादि काळापासून हें द्वीपकल्प अंधारांत गुडुप होतें. अध्यात्मिक जीवनाचें नांवहि नव्हतें. ज्यूंच्या वा ख्रिस्त्यांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रुढि, दुष्टता, दुर्गुण यांच्या घाणींत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत ! मोठा मुलगा स्वत:च्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत त्यांना स्वत:च्या बायका करी. थोडया वर्षांपूर्वी असा हा अरबस्थान होता. परंतु मुहंमदांनीं केवढें स्थित्यन्तर केलें ! जणुं स्वर्गातील देवदूत खालीं वावरायला आला. ज्यांचीं मनें अर्धवट जंगली होतीं, अशांचीं मनें भ्रातृभाव व प्रेम यांनीं भरुन गेलीं. अरबस्थान नैतिक दृष्टयाहि ओसाड वाळवंट होतें. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथें पायमल्ली होत होती. परंतु मुहंमदांनीं तेथें नैतिक नंदनवन फुलविलें. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाचीं फुलें फुलविलीं. मूर्तिपूजा व तदनुषंगिक इतर वाईट चाली यांचें निर्मूलन केलें. जो परात्पर प्रभु स्वत:च्या सामर्थ्यानें व प्रेमानें या विश्वाचें नियमन करितो त्या सत्य देवाची जाणीव अरबांना पूर्णपणें आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहंमदांनींच करुन दाखविला. मुस्लिम धर्मांत मूर्तिपूजा कोणत्याहि स्वरुपांत पुन्हां आली नाहीं आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणें केवळ एका ईश्वराला भजणारें मुहंमदांनी केलें. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबरांची वाणी अत्यन्त प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. परमेश्वराचें अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणें, तीव्रपणें क्वचितच् कोठें उपदेशिलें गेलें असेल उद्धोषिलें गेलें असेल. अरब अत:पर केवळ ऐहिक दृष्टीचे राहिले नाहींत. मरणानंतर अधिक उच्चतर, शुध्दतर व दिव्यतर असें जीवन असतें. त्या मरणोत्तर जीवनासाठीं या जीवनांत दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनांत दाखविलीं पाहिजेत, असें पैगंबरांनीं शिकविलें. हा जो अमूर्त परमेश्वर तो अनाद्यनन्त आहे. तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान्, प्रेमसिंधु व दयासागर आहे. ही जी नवजागृति आली त्याचें मुहंमद स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशानें या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते ! जणुं नव प्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झ-यांतून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वहात होते. आणि म्हणून मुहंमदांविषयीं अपार भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणुं आतां एकच इच्छा झाली कीं, त्या परमेश्वराची सत्यानें व पावित्र्यानें सेवा करावी. प्रभूची आज्ञा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबरांनीं जें जें सांगितलें, जीं जीं वचनें उच्चारिलीं, जें जें मार्गदर्शन केलें, जीं सत्यें दिलीं, तें सारें अरबांच्या हृदयांत जणुं कोरल्यासारखें झालें होतें. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीति यांचें ऐक्य झालें. सदसद्विवेकबुध्दीसाठीं आनंदानें बलिदानें करणारे दिसूं लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभूं लागले. जगाला एवढी मोठी जागृति इतक्या तीव्रपणें व उत्कटपणें क्वचितच् कोणी दिली असेल. मुहंमदांनीं आपल्या ह्यातींत आपलें कार्य पुरें केलें. बुध्दाचें काम अशोकानें पुरें केलें. ख्रिस्ताचें कॉन्स्टंटाईननें, झोरा आस्टरचें उरायसनें, इस्त्राएलांचें जोशुआनें. परंतु मुहंमदच एक असे झाले ज्यांनीं स्वत:चें व पूर्वी होऊन गेलेल्यांचेंहि कार्य पुरें केलें. जणुं सारें काम ईश्वरच करवीत होता, मुहंमद निमित्तमात्र होते, असें मुसलमानांनीं म्हटलें तर त्यांत काय आश्चर्य ? ज्याला काल परवांपर्यंत फत्तर फेंकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठीं जंग जंग पछाडीत होते, त्यानेंच नऊदहा वर्षांच्या अवधींत आपल्या लोकांना नैतिक अध:पाताच्या दरींतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविलं. प्रणाम, सहस्त्रप्रणाम, त्या महापुरुषाला.