इस्लामी संस्कृति 85
त्यांना नि:संशयपणें वाटे कीं आपण देवाचे संदेशवाहक आहों. त्यांना तसे अनुभव आले होते. किती त्यांचा मानसिक झगडा चालला होता. अशा झगडयांतून ती श्रध्दा निर्माण झाली होती. म्हणून ते म्हणत कुराण देवाचें आहे. ती माझी वाणी नाहीं. माझ्याद्वारें तो बोलत आहे. कुराणांत कांहीं कांही ठिकाणीं खरेंच अपार स्फूर्ति वाटते. परंतु जेथें कायदेकानुन आले आहेत, रोजच्या जीवनांत कसें वागावें याचे नियम आले आहेत, तेथेंहि ते संस्फूर्त असत का ? त्यांच्या कार्याचें क्षेत्र जसजसें वाढलें तसतसें शिकवणीचें क्षेत्र व्यापक करावें लागलें. ते पैगंबर होते, आतां राष्ट्रस्थापक झाले. राष्ट्रस्थापक या नात्यानें त्यांना अनेक नीतिनियम कायदे द्यावे लागले. परंतु ते फसवणूक नव्हते करीत. ईश्वराची स्फूर्ति व प्रेरणाच मला विचार देते, असें त्यांना वाटत असे. ते स्वत: नि:स्वार्थी होते. त्यामुळें आपण ईश्वराच्या हातांतील आहोंत असें त्यांना वाटे. केवळ मुत्सद्देगिरीनें, लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून देवानें असा आदेश दिला, असे विचार वदविले, असें नव्हते ते करीत. असे दांभिक ते असते तर आज दीड हजार वर्षे त्यांचें जीवन स्फूर्ति देत राहिलें नसतें.
हा दांभिकपणाचा आरोप जसा मिथ्या आहे त्याप्रमाणेंच रंगेलपणाचा. रंगेला रसूल, अशीं चोपडीहि त्यांच्यावर लिहिलीं गेली. परधर्माचा अभ्यास करण्याची ही रीत नव्हे. रंगेल्यांच्या पाठीमागें कोटयवधि लोक शेकडों वर्षे गेले नसते. दुस-याच्या धर्माविषयीं अभ्यास करतांना अत्यंत आपुलकीची भावना हवी.
कुराणांत पैगंबरांनीं चार बायका करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शेवटीं तर एकच बरी असेंहि मत दिलें आहे. शिवाय सर्व बायकांना समतेनें नसेल वागवतां येणार तर अधिक बायका करूं नकोस, असेंहि त्यांनीं सांगितलें आहे. अरबस्थानांत किती बायका कराव्या याला सुमारच नसे. मुहंमदांनी त्याला बंधन घातलें. कांही मर्यादा घातली. तेथें एकदम एकपत्नीव्रत सांगते तर कोणी ऐकतेहि ना.
टीकाकार व निंदक म्हणतात, 'पैगंबरांनीं इतरांना चारच बायका ठेवल्या. स्वत: मात्र किती तरी केल्या !' एक गोष्ट आधीं लक्षांत ठेवली पाहिजे कीं कुराणांतील चार पत्नींची मर्यादा सांगणारें वचन त्यांच्या मुखावाटे बाहेर पडण्यापूर्वी त्यांचीं सारीं लग्नें झालीं होतीं, त्या वचनानंतर नव्हत. ज्यांना त्यांनीं चारच बायकांची परवानगी दिली, ते काडीमोड करूं शकत असत. आणि पुन:पुन्हां अनेक लग्नें करूं शकत असत. मुहंमदांनी कधीं काडीमोड केली नाहीं. परंतु मुख्य गोष्ट आहे ती ही कीं मुहंमदांनीं केलेलीं लग्नें ही विषयसुखार्थ नव्हतीं, विलासार्थ नव्हतीं. अनेक कारणांमुळें तीं त्यांना करावीं लागलीं. त्या लग्नांचे इतिहास पहाल तर त्या लग्नांतून विलासिता न दिसतां मुहंमदांची त्यागता व उदात्तताच दिसेल. आणि पहिली पत्नी-ती थोर खदिजा, ती जोंपर्यंत जिवंत होती तोंपर्यंत पैगंबरांनीं कधींहि लग्न केलें नाही. यावरुन त्यांची दृष्टि दिसते. ते केवळ भोगी असते तर खदिजा मरण्यापूर्वीहि सुंदर बायको करते. खदिजा वृध्द झाली होती. ती त्यांच्यापेक्षां वयानें मोठी होती. तरी तिच्याशीं निष्ठावंत राहिले. खदिजा ६५ वर्षांची होऊन मरण पावली. तिच्या मरणानंतरची पैगंबरांची सारीं लग्नें ! सौदेजवळ त्यांनीं लग्न केलें. ती एक विधवा होती. तिचा नवरा मुस्लिम झाला होता. तो अबिसीनियांत त्यांच्याबरोबर गेला होता. तो तिकडेच निर्वासित असतां मरण पावला. पत्नी निराधार. मुहंमद तिचा सांभाळ कसा करुं शकते ? तिच्या पतीनें नवधर्मार्थ सर्वस्व दिलें होतें. ती अनाथ पत्नी परत आली, विधवा होऊन आली ! पैगंबरांनीं तिला पत्नी करुन तिचा सांभाळ केला. जे पुढें खलिफा झाले, जे पैगंबरांना अगदीं आरंभीं मिळाले ते अबुबकर. त्यांना एक मुलगी होती. तिचें नांव आयेषा. ती केवळ ७ वर्षांची. परंतु अबुबकर यांची फार इच्छा कीं ती पैगंबरांस द्यावी. अरबांत पति मेल्यावर पुन्हां विवाह करतां येत असे. मुस्लिम धर्मात ती परवानगी आहे. पैगंबरांच्या पत्नींना मात्र पुनर्विवाहाची परवानगी नव्हती, आयेषाचा स्वीकार मुहंमदांना करावा लागला, कारण अबुबकर म्हणाले, 'तुमच्याबद्दल मला जे कांहीं वाटतें त्याची खूण म्हणून ही कन्या घ्या.' मुहंमदांनीं तिचा स्वीकार केला. आणि पुढें जो दुसरा खलिफा झाला तो उमर. त्या उमरला एक मुलगी होती. तिचा पहिला नवरा बद्रच्या लढाईत पडला. तिच्या पुन्हा लग्नाविषयीं उमर बेफिकीर होता. ही मुलगी मोठी कडक होती. तिच्याजवळ विवाह कोण करणार ? उमर आपल्या मुलीची काळजी घेत नाहीं असें लोक म्हणू लागले, त्याला नांवें ठेवूं लागले. तेव्हा उमर अबुबकर यांच्याकडे गेले व म्हणाले, 'तुम्ही माझी मुलगी करा.' परंतु अबुबकर यांनी नकार दिला. उमर उस्मानकडे गेला व त्याला प्रार्थना करता झाला. उस्माननेंहि ती गोष्ट नाकारली. उमरचा स्वभाव रागीट व मानी होता. तो रागावला. त्याला अपमान वाटला. तो रागानें लाल होऊन पैगंबरांकडे आला. पैगंबरांनीं त्या मुलीशीं लग्न लावलें व उमरला शांत केलें. अशीं हीं तीन लग्नें. आणि तें झैनबजवळचें लग्न. त्याचा इतिहास आहे. मुहंमदांचा आवडता प्रिय शिष्य झैद होता. तो गुलाम होता. मुहंमदांनीं त्याला मुक्त करुन त्याचें झैनबशीं लग्न करुन दिलें. झैनब खानदान घराण्यांतील. ती सुंदर होती. तिला हा विवाह सलत होता. पतिपत्नींचें पटेना. खटके उडत. एकदां मुहंमद झैदच्या घरीं गेले होते. त्यावेळे झैनबचें मुख अनाच्छादित होतें. तिचें सुंदर मुखकमल पाहून पैगंबर म्हणाले, 'ईश्वराला धन्यवाद ! मानवी हृदयांचा तो खरा सत्ताधीश.' पैगंबरांच्या म्हणण्याचा अर्थ ज्या ईश्वरानें असें सौंदर्य निर्मिलें तो किती थोर व सुंदर असेल ! मनुष्याच्या हृदयानें त्या सौंदर्यसागर ईश्वराला वरावें. मानवी हृदयांवर खरी सत्ता त्या सुंदरतम प्रभूची असावी. मुहंमद निघून गेले. झैनबला गर्व वाटला. ती झैदला म्हणे, 'पैगंबरहि माझ्या सौंदर्याची स्तुति करतात. बघ.' एके दिवशीं झैद त्रासून पैगंबराकडे आला व म्हणाला, 'काडीमोड करावी असें वाटतें.'