इस्लामी संस्कृति 26
हे लग्न अत्यन्त कल्याणप्रद व शुभमंगल असें झालें. दोघांचें एकमेकांवर फार प्रेम. खदिजेचें हृदय अत्यंत प्रेमळ होतें. मुहंमदांविषयी तिला अपार प्रेम वाटे. या लग्नाने मुहंमदांस शांति, विश्रांति मिळाली. कामाची दगदग राहिली नाहीं. पोटाची विवंचना उरली नाही. ज्या महान् कार्यासाठीं त्यांचा जन्म होता त्याचा विचार करायला त्यांचें मन मोकळें झालें. प्रेमळ स्त्री-हृदय त्यांना मिळालें. या अवघ्या जगांत त्यांच्या अवतारकार्यावर तिनेंच प्रथम विश्वास ठेविला. निराशेंत ती त्यांना शांतवी, आधार देई, धीर देई. ती आशेची ज्योत विझूं देत नसे. जेव्हां जगाचाच नव्हे तर स्वत: मुहंमदांचाहि स्वत:वर विश्वास बसेना तेव्हां तिनें विश्वास ठेवला ! ज्यावेळेस मुहंमदांच्या डोळयांसमोर अंधारमय सारें होतें, तेव्हां तिनें श्रध्देचा, आशेचा दीप प्रज्वलित ठेवला.
खदिजेपासून मुहंमदांस सात मुलें झालीं. तीन मुलगे व चार मुली. परंतु सारे मुलगे बाल्यांतच मेले. मुहंमदांस मुलगा राहिला नाहीं. त्यांचे शत्रु त्यांचा उपहार करण्यासाठी 'अल्-अब्त्तर' म्हणजे निपुत्र्या असें त्यांना संबोधीत.
लग्नानंतरची पंधरा वर्षे मक्केंत आत्मचिंतनांत गेलीं. या पंधरा वर्षाची फारशी हकीगत नाहीं. ते फारसें बोलत नसत. परंतु जेव्हां बोलत तेव्हां जोर देऊन बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. मुहंमद जे बोलत तें ऐकणारा कधीं विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणारावर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळां ते अशान्त, सचिन्त, कष्टी असे असत. गळून गेलेले असे दिसत. निरुत्साही दिसत. परंतु एकदम कोठून तरी त्यांना स्फूर्ति येई. उत्साह संचरे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हंसूंबोलूं लागत.
आणि लहान मुलें म्हणजे त्यांचा प्राण ! ही भावी पिढी जणुं ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठींवरुन हात फिरवतील. त्यांना लहान लहान गोष्टी सांगतील. त्यांच्या बरोबर द-याखो-यातूंन, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील, ख्रिस्तही लहान मुलांचा असाच शोकी होता. मुलें म्हणजे देवाची प्रभा !
या पंधरा वर्षांच्या काळांत अंत:परीक्षण चाललें होतें. श्रध्दा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिध्दता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
अब्दुल मुत्तलिब मेल्यापासून मक्केंत एकजूट राहिली नव्हती. जे शहरचे खरे नागरिक त्यांना एकरक्तत्वामुळें संरक्षण असे. परंतु परकीयांचे जीवन मक्केंत सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. मुहंमदांस हा अन्याय पाहवेना. 'हल्फ-उल्-फझूल' नांवाची त्यांनीं एक संस्था स्थापिली. प्राचीन काळीं अशी एक संस्था होती. तिच्यांत फझल, फझाल, मुफ्फझल, फुझेल असे चार लोक होते. त्यांच्या संघास फझूल म्हणत. त्या प्राचीन संस्थेचें मुहंमदांनी पुनरुज्जीवन केलें. लग्न झाल्यानंतर थोडयाच दिवसानीं इ.स.५९५ मध्यें ही संस्था त्यांनीं स्थापिली. मुहंमद या संस्थेचे मुख्य होते. हाशिब व मुत्तलिब यांच्या घराण्यांतील सारे या संस्थेंत सामील होते. या संस्थेच्या दबदब्यामुळें दुबळयांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेनें जरा धमकी देतांच काम होत असे. धटिंगणांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढें इस्लामच्या अर्ध्या शतकापर्यंत, सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.